Tue, May 26, 2020 11:49होमपेज › Nashik › सेनेच्या पराभवासाठी भाजप काँग्रेस-राष्‍ट्रवादीसोबत

सेनेच्या पराभवासाठी भाजप काँग्रेस-राष्‍ट्रवादीसोबत

Published On: May 21 2018 8:19AM | Last Updated: May 21 2018 8:18AMनाशिक : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा मतदारसंघात आज (२१ मे )मतदान होत आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या निवडणुका स्वबळावर लढत असले, तरी त्यांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत. मात्र, नाशिकमध्ये भाजपने वेगळीच खेळी खेळली आहे. नाशिकमध्ये भाजपने राष्‍ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे. 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून राजेंद्र गावित, शिवसेनेकडून दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. पालघरमधील  वचपा काढण्यासाठीच भाजपने नाशिकमध्ये ही खेळी खेळल्‍याचे बोलले जात आहे. या पाठिंब्‍यामुळे भाजपची १९७ मते निर्णायक ठरणार आहेत. 

सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड, नाशिक, अमरावती, परभणी-हिंगोली, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली आणि लातूर - बीड - उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांचे नगरसेवक हे या निवडणुकीत मतदान करणार असल्याने कुठे कुणाचे संख्याबळ किती आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून, त्यानुसार सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड (कोकण), नाशिक आणि लातूर - बीड - उस्मानाबाद या तीन जागा राष्ट्रवादीला, तर अमरावती, परभणी - हिंगोली आणि वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली या जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यात युती नसली, तरी त्यांनी एकमेकांविरोधात उमेदवार देण्याचे टाळले आहे. 

 

Tags : nashik, Legislative Council election, BJp,  Congress NCPs alliance