Tue, Nov 19, 2019 03:21होमपेज › Nashik › शिक्षकच निघाला दुचाकी चोर!

शिक्षकच निघाला दुचाकी चोर!

Published On: Jul 17 2019 3:34PM | Last Updated: Jul 17 2019 3:34PM
धुळे : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देणारा शिक्षकच मोटार सायकल चोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार धुळयाच्या शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुढे आला. विजय शंकर गवळी असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. या शिक्षकाने त्याच्या नातेवाईक तरुणाच्या मदतीने चोरुन विक्री केलेल्या आठ मोटारसायकली जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांनी दिली.

धुळे शहरातून मोठया प्रमाणावर मोटार सायकलींची चोरी होण्याच्या घटनांमधे वाढ झाली होती. बस स्थानक, न्यायालय तसेच रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या गाड्या चोरटे लक्ष्य करीत असल्याचे दिसत असल्याने पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे व अपर पोलिस अधिक्षक डॉ. राजू भुजबळ यांनी या भागावर साध्या वेशातील पोलिसांना लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.

यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांनी चोरी झालेल्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज काढून त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली. यात संशयितांचे फोटो आले, पण ते सराईत गुन्हेगार नसल्याने त्याचे रेकॉडे कोणत्याही पोलिस ठाण्यात नसल्याने चोरटे पोलिसांना गुंगारा देत होते.

अखेर शहर पोलिस ठाण्यातील शोध पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नाना आखाडे, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, मुख्तार मन्सुरी आदी पथकांनी गुप्त माहितीदारांची मदत घेतली. यातून एका संशयिताचा मोटारसायकलीसह फोटो त्यांना मिळाला. त्यानुसार मोटार सायकलीचा नंबर प्रादेशीक परिवहन विभागात तपासून पत्ता शोधण्यात आला. त्यात धुळयातील गोकुळ नगरात रहाणारा ऋषिकेश रमेश गवळी याला ताब्यात घेवून विचारपूस केल्यानंतर नंदुरबार येथील शिक्षक विजय शंकर गवळी याचे नाव पुढे आले.

या दोघांना पोलिस खाक्या दाखवताच त्यांनी आठ गाड्या चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर या गाड्या त्यांनी नंदुरबार परिसरात विकल्या असल्याचे समजल्याने या गाडया ताब्यात घेण्यात आल्या. या प्रकरणात शिक्षक असणारा तरुण व त्याच्या नातेवाईकाने वीज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन त्याची रोकड लुटल्याची माहिती देखील पुढे आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन हिरे व पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांनी दिली.