धुळे : प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधपतन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला जोडे मारणारे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्राध्द घालणा-यांना पक्षात सन्मानाचे स्थान देवुन त्यांना पायघडया घातल्या जात आहेत, जिल्हा भाजपमध्ये काँग्रेस संस्कृती सुरु झाल्याने आपण आता भाजपाच्या आमदारकीचा विधीमंडळ अधिवेशनाच्या पहील्याच दिवशी राजीनामा देणार असल्याची घोषणा आज आमदार अनिल गोटे यांनी पुढारीशी बोलताना दिली. यासंदर्भातसोशल मिडीयावरुन भाजपाच्या सर्व आमदारांना देखील पाठविण्यात आला आहे.
धुळयात भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासुन मोठया प्रमाणावर गटबाजी सुरु आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व रोहयो मंत्री जयकुमार रावल तसेच आमदार अनिल गोटे यांच्यामध्ये विस्तव देखील जात नाही. धुळे महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच हा वाद आणखी विकोपाला गेला आहे. दोन दिवसांपुर्वी धुळयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे, राज्याचे मंत्री जयकुमार रावल व मंत्री गिरीष महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्याच्या मंचावर एक बॅनर लावण्यात आला . यामध्ये धुळयाचे भाजप आमदार अनिल गोटे यांचा फोटो नव्हता. तसेच मेळाव्याचे आमंत्रणही देण्यात आले नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कार्यक्रमात असल्याने ही बाब त्यांच्या कानावर टाकण्यासाठी आमदार गोटे मेळाव्यात आले. यावेळी त्यांना भुमिका मांडण्यास विरोध करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्की झाल्याने आ गोटे यांनी रात्री झालेल्या सभेत भारतीय जनता पार्टीत सुरु असलेल्या गटबाजीवर टिकास्त्र सोडले.
आपण महापालिका निवडणुकीत महापौर पदाचे उमेदवार असल्याचे देखिल त्यांनी जाहीर केले. त्यातच आज सोशल मिडीयावरुन त्यांनी भाजपाच्या सर्व आमदारांना आवाहन करीत विधीमंडळ अधिवेशनाच्या पहील्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांना भेटुन राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात भुमिका मांडताना त्यांनी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्यावर टिकेची तोफ डागली आहे.
मंत्री भामरे हे काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करुन भाजपात आले आहेत. त्यामुळे ते बॅनरवर फोटो टाकण्यास टाळणे, पक्षाच्या कार्यक्रमांना न बोलावणे अशा पध्दतीने गटबाजी करीत आहेत. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासुन आजपर्यंत पक्षाच्या कामासाठी काम करत आहे. त्यामुळे इतर पक्षातुन आलेल्यांनी निष्ठा शिकविण्याचे काम करू नये. आता धुळयात अटलजी तसेच उत्तमराव नाना यांच्या स्वप्नातील भाजपा शिल्लक राहीला नाही. त्यामुळे आपण राजीनामा देणार असल्याचे गोटे यांनी सांगितले.