Tue, May 26, 2020 11:11होमपेज › Nashik › चालकांकडून इंदाणी ट्रॅव्हल्सच्या संचालकावर प्राणघातक हल्ला, पाच लाखांची रक्कम पळविली

चालकांकडून इंदाणी ट्रॅव्हल्सच्या संचालकावर प्राणघातक हल्ला, पाच लाखांची रक्कम पळविली

Published On: Oct 24 2018 3:06PM | Last Updated: Oct 24 2018 3:51PMनाशिक-पंचवटी : पुढारी ऑनलाईन

पंचवटीतील पेठ रोडवरील भक्तिधाम मंदिराजवळ बस सरळ लावण्यास सांगितल्याच्या रागातून चौधरीयात्रा कंपनीच्या बसचालक व क्लिनरने इंदाणी ट्रॅव्हल्सच्या संचालकावर प्राणघातक हल्ला करून त्याच्याकडील ४ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी चौधरी यात्रा कंपनीच्या १२ जणांना पंचवटी पोलिसांनी अटक केली असून, या घटनेत मयूर चंद्रकांत इंदाणी गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पेठ रोडवरील भक्तिधाम मंदिराजवळ खाजगी बसवाहतूक केली जाते. येथून गुजरातमध्ये प्रवाशांसह माल वाहतूक ही केली जाते. मंगळवार दि. २३ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भक्तिधाम या ठिकाणी इंदाणी ट्रॅव्हल्स व चौधरी यात्रा कंपनीच्या ट्रॅव्हल बसेस प्रवासी भरून निघण्याच्या तयारीत होत्या. याचदरम्यान मयूर चंद्रकांत इंदाणी (वय ३२, रा. कृष्णनगर, तपोवन रोड, आडगाव नाका, पंचवटी) हे आपल्या ट्रॅव्हल्सवरील ड्रायव्हरला प्रवासासाठी डिझेल व टॅक्सचे पैसे देण्यासाठी आले होते. 

यावेळी त्यांनी आपली ट्रॅव्हल बस पार्क करण्यासाठी पुढे उभ्या असलेल्या चौधरी यात्रा कंपनीच्या बसवरील चालकाला त्याची बस पुढे घेऊन सरळ लावण्यास सांगितले. त्याचाच राग येऊन या बसमधील संशयित चालक व क्लिनर यांनी मयूर इंदाणी यांना शिवीगाळ सुरू केली. याच वेळी चौधरी यात्रा कंपनीच्या या चालक व क्लिनरने आणखी १० ते १५ साथीदारांना येथे बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून इंदाणी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर चौधरी यात्रा कंपनीच्या त्या बसवरील चालक व क्लिनर यांनी मयूर इंदाणी यांच्या डोक्यावर व डाव्या हाताच्या पंजावर रॉडने व पहारीने वार करून त्यांना जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला.

या हाणामारीत १० ते १५ संशयितांनी इंदाणी यांच्या हातातील ४ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम ठेवलेली पिशवी लुटून पळ काढला, तर या हाणामारीत इंदाणी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठी व सॅमसंग मोबाईल खाली पडून नुकसान झाले आहे . 

या गुन्ह्यात इंदाणी गंभीर जखमी झाले असून, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत सहभागी चौधरी यात्रा कंपनीच्या १५ पैकी १२ जणांना अटक करण्यात आली. या घटनेत प्राणघातक हल्ला करून जबरी लूट, बेकायदेशीर जमाव जमविल्याचा व पोलीस उपायुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा या संशयितांवर पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश उबाळे करीत आहेत.

खासगी ट्रॅव्हल्स वाहतुकीला अडथळा आणत उभ्या 

पेठरोडवरील भक्तिधाम समोर बेकायदेशीररीत्या खासगी ट्रॅव्हल्स मालक आपल्या अनेक बस बेशिस्तपणाने भर रस्त्यात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने उभ्या करीत असता . त्यामुळे अनेकदा नागरिक आणि या बस चालकांमध्ये भांडण होते . या सर्व गोष्टींकडे वाहतूक शाखा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे . 

अवैध्य माल वाहतूक

अशाच खासगी बसमधून दसरा आणि दिवाळीच्या सणांना भेसळयुक्त खवा मोठ्या प्रमाणात आणून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार अनेकदा पुढे आला आहे .तसेच गुजरातमधून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा देखील मोठया प्रमाणात नाशिकमध्ये आणला जातो. याबाबत काही बस चालकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहे. मात्र,आथिर्क हितसंबधांमुळे या खासगी बस व्यावसायिकांच्या मनमानीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.