संदीप दुनबळे
आयात उमेदवार, नाराजी आणि अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे ही लढत अवघड बनली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपले पत्ते अखेरपर्यंत उघड केलेले नाहीत. माकपाच्या जिवा पांडू गावित यांनीही रिंगणात उडी घेऊन तिरंगी लढत अटीतटीची बनविली आहे.
युतीच्या डॉ. भारती पवार, काँग्रेस महाआघाडीचे धनराज महाले, माकपचे आमदार जिवा पांडू गावित आणि वंचित बहुजन आघाडीचे बापू बर्डे हे उमेदवार रिंगणात उतरले असले तरी खरा सामना तिघांमध्येच होत आहे. डॉ. पवार आणि महाले हे दोघेही उमेदवार त्या-त्या पक्षांसाठी आयात असल्याने मतदारांना सामोरे जाताना त्यांची दमछाक होत आहे. डॉ. पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली. दुसरीकडे खा. शरद पवार यांचीही गिरणारे येथे जाहीर सभा झाली. ज्या ठिकाणी सभा झाली ते गिरणारे नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. या ठिकाणी सभा घेऊन नाशिक आणि दिंडोरी या दोन्हीही उमेदवारांसाठी पवार यांनी मतदारांना साद घातली. उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज असलेले खा. चव्हाण यांनी मोदी यांच्या सभेला व्यासपीठावर हजेरी लावली; परंतु ते एकाकी पडल्याची बाब लपून राहिली नाही. त्यामुळे ते काय करतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. शिवसेनेचे जि.प. सदस्य भास्कर गावित यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जयश्री पवार आणि त्यांचे पती नितीन पवार हे महाले यांना आघाडी देण्यासाठी आटापिटा करीत असले तरी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी मात्र डॉ. पवार यांना छुपी मदत करीत आहेत. गावित यांचा प्रभाव पेठ, सुरगाणा या भागात असला तरी ते संपूर्ण मतदारसंघात शेतकर्यांचा मुद्दा घेऊन मतांचा जोगवा मागत आहेत. एकंदरीत, या सार्या साठमारीत नेमके कोण बाजी मारणार, याचा अंदाज बांधणे अवघड आहे.