Wed, Jul 08, 2020 20:36होमपेज › Nashik › धुळे मनपा : भाजप मुसंडी मारणार ?

धुळे मनपा : भाजप मुसंडी मारणार ?

Published On: Dec 10 2018 9:36AM | Last Updated: Dec 10 2018 9:36AM
धुळे : यशवंत हरणे
 

धुळे महानगरपालिकेच्या ७४ जागांसाठी आज ३५५ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले. धुळ्यात भाजपा जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. भाजप ३ जागांवरून २५ पेक्षा जास्त जागा घेईल अशी शक्यता आहे.  सत्ताधारी राष्ट्रवादीची पीछेहाट होऊन त्यांना काँग्रेस सह ३० ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

आज होणार्‍या मतमोजणीनंतर महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी आाणि भाजपामध्येच सत्तास्थापनेसाठी खरी काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र दिसुन येते आहे. धुळे महानगरपालिकेच्या ७४ जागांसाठी ३५५ उमेदवारांनी आपले भविष्य आजमावले. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना सर्व जागांवर उमेदवार देणे शक्य झाले नाही. भारतीय जनता पार्टीने ६२ जागांवर, शिवसेनेने ४८ जागांवर, राष्ट्रवादीने ४५ व काँग्रेसने २२, सपाने १०, एमआयएमने १२, बसपाने ९, भारीपने ५, रासपने १२, लोकसंग्रामने ६१ तर इतर ६९ जणांनी उमेदवारी केली. यात भारतीय जनता पक्षाने ५० प्लसचा नारा देत मनपावर आपलाच झेंडा असल्याचा दावा अनेकदा केला, पण केवळ ६२ उमेदवार दिलेले असल्याने भाजपाचा हा दावा किती खरा ठरणार हे निकालानंतरच कळेल.

त्यामुळेच त्यांनी राज्यात मित्र असणारे मंत्री महादेव जानकर यांच्या रासपच्या माध्यमातून मुस्लिम भागात १२ उमेदवार देऊन या भागातून राष्ट्रवादी आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण याच याभागात मोठा प्रचार झाल्याने भाजपाला नाकारणा-या मतदार रासपला स्विकारण्याची शक्यता कमीच आहे. असे असले तरीही पेठ आणि मिल भागातुन भाजपच्या उमेदवारांना मोठा फायदा होण्याचे चित्र आहे. या आधारावर भाजपा २० ते २५ जागांवर विजय मिळवु शकतात. यातही लोकसंग्रामच्या माध्यमातुन आमदार अनिल गोटे यांनी भाजपासमोर ६१ उमेदवार दिले असुन उर्वरीत जागांवर शिवसेनेला पाठींबा दिला आहे. 

शिवसेनेने देखील त्यांचे उमेदवार नसलेल्या १५ जागांवर लोकसंग्रामला पाठींबा देवुन भाजपाच्या या भागातील उमेदवारांचा विजय अवघड केला आहे. हे गणित यशस्वी झाल्यास भाजपाला २० चा आकडा गाठणे अवघड होणार असल्याचे चित्र आहे. त्याच्या जोडीला शिवसेनेला ५ ते १० जागांच्या दरम्यान जागा मिळु शकतात. तर लोकसंग्राम पाच जागांपर्यंत मुसंडी मारण्याची शक्यता आहे. दुस-या बाजुला मनपाची हद़द वाढ झाल्याने ११ गावांचा समावेश महानगरात झाला असुन या गावांवर कॉग्रेसचा प्रभाव आहे. त्यामुळे या बळावर काँग्रेस १० जागांचा आकडा गाठणार असल्याचे चित्र होवु शकते. तर धुळयात चार प्रभागातील किमान १४ जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव असल्याने या जागांवर राष्ट्रवादी , काँग्रेस तसेच मित्र पक्षांचे उमेदवार विजयी होणार आहे. 

 राष्ट्रवादी शहर , पेठ, मोहाडी , साक्री रोड लगतच्या प्रभागातुन किमान २० ते २५ जागांवर विजय घेवू शकतात. यापूर्वी समाजवादी पक्षाची एक जागा बिनविरोध झाली असुन या पक्षाची आणखी एक जागा येण्याची शक्यता आहे. एमआयएमची देखील दोन जागांवर चांगली स्थिती असुन ते मनपामधे खाते उघडणार असल्याचे चित्र आहे. तर बसपाचा हत्ती किमान एका जागेवर विजयी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे चित्र आहे. वरील शक्यतांचा विचार करता राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ३० ते ३५, तर भाजपला २० ते २५ जागा मिळणार असल्याचा अंदाज असुन मनपावर मित्रपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्याची शक्यता मोठी आहे. असे असले तरीही मनपावर कोणाची सत्ता येईल हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.