Sat, Jan 23, 2021 06:11होमपेज › Nashik › ‘क्रांतीसूर्य भुजबळांना बांडगुळांनी जेलमध्ये डांबलेय’

‘क्रांतीसूर्य भुजबळांना बांडगुळांनी जेलमध्ये डांबलेय’

Published On: Mar 11 2018 12:33PM | Last Updated: Mar 11 2018 12:33PMनाशिक : प्रतिनिधी

आजच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने खर्‍या अर्थाने आमदार छगन भुजबळ यांची उणीव भासत असून, त्यांची पदोपदी आठवण येत असल्याच्या भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखविल्या. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, भाषणात भुजबळांबद्दल बोलणे टाळले.  क्रांतिसूर्याविना ही सभा घ्यावी लागत असल्याचे शल्य व्यक्त करतानाच भाजपातील काही बांडगुळांनी जेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केला. ते आज बाहेर असते तर या सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडले असते.

दरम्यान, खुद्द शरद पवार यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भुजबळांच्या तब्येतीची काळजी व्यक्त केली. पवार हे भुजबळांच्या पाठीशी उभे असल्याने त्यांचे कोणीही काही वाकडे करू शकणार नाही अशा  शब्दात मुंढेंनी भावना व्यक्त केल्या. हल्लाबोलच्या तिसर्‍या  टप्प्यांतील समारोपाच्या प्रसंगी भुजबळांची आठवण होत आहे. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यावर  पहिले अध्यक्ष होण्याचा मान भुजबळांना मिळाला असून, त्यांच्या पायगुणाने राज्यात  सत्ता मिळाल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. भुजबळांची अनुपस्थिती  येवल्याच्या सभेत भासली तरी ती सभा यशस्वी केल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

भुजबळांशिवाय जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसल्याची भावना आ. जाधव, रवींद्र पगार  व रंजन ठाकरे यांनी व्यक्त केली. एकीकडे पक्षाच्या शहराध्यक्षापासून ते प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्वच जण भुजबळांच्या अनुपस्थितीबद्दल बोलत असताना शरद पवार यांनी त्यांच्याबद्दल बोलणे ओघानेच टाळले. त्यामुळे उपस्थितांमध्ये त्याबाबत चर्चा रंगली. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने भुजबळ  समर्थकांनीही शक्तिप्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही. सभेच्या ठिकाणी भुजबळ यांचे  मोठे-मोठे बॅर्नर लावण्यात आले होते. तसेच शरद पवार  यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  लावलेल्या फलकांवरदेखील भुजबळांच्या प्रतिमा झळकत होत्या. या यात्रेच्या माध्यमातून भुजबळ समर्थकांनी पक्षातील त्यांच्या नेतृत्वाची उणिवेची जाणीव करून दिली.