Fri, Jun 05, 2020 06:26होमपेज › Nashik › चुंभळे ‘उत्पादन शुल्क’च्या ताब्यात 

चुंभळे ‘उत्पादन शुल्क’च्या ताब्यात 

Published On: Aug 21 2019 1:35AM | Last Updated: Aug 20 2019 11:07PM
नाशिक : प्रतिनिधी

निवासस्थानी सैन्य दलाकडील मद्यसाठा ठेवल्या प्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. चुंभळे यांना लाचप्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, अवैध मद्यसाठ्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यामुळे मंगळवारी (दि.20) सायंकाळी विभागाने त्यांचा ताबा घेतला. 

शिवाजी चुंभळे यांना कृउबात शुक्रवारी (दि.16) लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर चुंभळे यांच्या घरझडतीत सैन्य दलाकडील मद्यसाठा आढळून आला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने न्यायालयाकडे चुंभळे यांचा ताबा मिळावा, अशी मागणी केली होती. त्यास न्यायालयानेही संमती दिली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्‍या चुंभळे यांना कारागृहात नेण्यात आले. तेथून विभागाने चुंभळे यांचा ताबा घेतला. चुंभळे यांच्याविरुद्ध तक्रार देणार्‍याने पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आपल्या जीवितास धोका असल्याचे पत्र दिले आहे.

कसून चौकशी होणार

चुंभळे यांच्या घरातील मद्यसाठा सैन्य दलातील आहे का? तसेच, तो चुंभळे यांना कोणी दिला, याची चौकशी होणार आहे. मद्यसाठा सैन्य दलातील नसल्यास त्याचे बनावटीकरण कोणी केले किंवा हा मद्यसाठा कोणी व कोठून आणला याची चौकशी चुंभळे यांच्याकडे होणार आहे.