Mon, Jun 01, 2020 08:14होमपेज › Nashik › फायली फिरविणे नगरसेवकांचे काम नव्हे : तुकाराम मुंढे

फायली फिरविणे नगरसेवकांचे काम नव्हे : तुकाराम मुंढे

Published On: Feb 10 2018 10:26AM | Last Updated: Feb 10 2018 11:17AMनाशिक : प्रतिनिधी

प्रभागातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी यापुढे नगरसेवक वा त्यांच्या कार्यकर्त्यांना हातोहात फाईल घेऊन फिरता येणार नाही. कारण, या प्रकारावर खुद्द नवनियुक्‍त आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनीच लक्ष केंद्रित केले आहे. असे झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवरच कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिला असून, मनपात कागदी घोडे नाचविणार्‍या अधिकार्‍यांना त्यांनी सावधानतेचा इशाराच दिला आहे. अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी आपापल्या अधिकाराच्या मर्यादेत राहून कायद्यानुसारच काम करण्याचा सल्लाही त्यांनी मनपाच्या पदाधिकार्‍यांना देखील दिला आहे.

शुक्रवारी आयुक्‍त मुंढे यांनी मनपातील सर्वच खातेप्रमुखांची बैठक घेत कामकाजाची माहिती दिली. नागरिकांना विविध सेवासुविधा उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचविण्याचे काम महापालिकेचे आहे. त्यादृष्टीने माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांची कामे करावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. एकाच कामासाठी वारंवार महापालिकेत खेटा मारणे, अधिकार्‍यांना भेटणे, दूरध्वनी करणे यासारखे प्रकार नागरिकांना करावे लागतात. यात त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. यामुळे यापुढे असे प्रकार घडू नये याविषयी अधिकार्‍यांना त्यांनी विविध प्रकारच्या सूचना केल्या.

आर्थिक समृध्दी आणि राहण्यायोग्य शहर कसे विकसीत करता येईल याअनुषंगाने काम करण्याचा प्रयत्न असून, काम करताना अधिकार्‍यांनी दबाव न घेता नागरिक केंद्रबिंदू ठेवूनच काम केले पाहिजे. अनेकदा कामे मार्गी लागण्यासाठी किंवा अन्य उद्देशाने नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते फाईल एका विभागातून दुसर्‍या विभागाकडे ने आण करण्याचे काम करत असतात. वास्तविक हे काम अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे आहे. यामुळे यापुढे नगरसेवकांनी फाईल न फिरविता ती अधिकार्‍यांमार्फतच फाईलचा प्रवास झाला पाहिजे. तसे न झाल्यास संबंधित अधिकार्‍यावर कारवाई केली जाणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

नागरिकांना मोबाईल तसेच इ गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा मिळाली पाहिजे. त्याचबरोबर पारदर्शक आणि रिजल्ट ओरिएन्टेड काम करण्याच्या दृष्टीने अधिकार्‍यांनी काम करण्याबाबतही त्यांनी आदेशीत केले असून, नागरिकांना सेवा देण्याचे उत्तरदायित्व मनपाचे आहे. यामुळे नागरिकांना तत्काळ सुविधा देण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आदेश दिले.

नगरसेवकांना दिला सल्ला

अधिकारी व कर्मचार्‍यांना कार्यालयात बोलावून काम करून घेणे किंवा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करण्याचे प्रकार काही पदाधिकार्‍यांकडून होत असल्याने आता अशा प्रकारांनाही आळा बसणार आहे. यासंदर्भात आयुक्‍त मुंढे यांनी ज्याने त्याने आपापल्या मर्यादा आणि अधिकार ओळखून कायद्यानुसार काम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे यापुढे महापालिकेत प्रशासकीय कामकाजात लूडबुड करण्याबाबतही नगरसेवक व पदाधिकार्‍यांना चारदा विचार करावा लागणार आहे.

इतर बातम्या :

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच नाशिकला : आयुक्‍त मुंढे

पालघरमध्ये कनिष्ठ सहाय्यक पुन्हा झाले शिपाई!

इंजिनिअर तरुणाने फुलवली गुलाबाची शेती

'शरद पवारांनी कर्जमाफीचा ढोल वाजविला'

कुलगुरूंचीच डिग्री हरवते तेव्हा!