Tue, May 26, 2020 10:43होमपेज › Nashik › मुक्त विद्यापीठातील दहा पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद

मुक्त विद्यापीठातील दहा पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद

Published On: Sep 25 2019 1:48AM | Last Updated: Sep 25 2019 1:48AM
नाशिक : प्रतिनिधी

‘ज्ञानगंगा घरोघरी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील तब्बल दहा पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याचे आदेश यूजीसीने दिले आहेत. यामध्ये राष्ट्रभाषा हिंदी आणि मातृभाषा मराठीचा समावेश आहे. यूजीसीच्या या निर्णयामुळे सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांची शिक्षणाची संधी हुकणार आहे. विशेष म्हणजे यापैकी 20 हजार विद्यार्थी एकट्या एम.ए मराठीचे आहेत.

मुक्त विद्यापीठाचा विस्तार संपूर्ण राज्यात आहे. सध्या राज्यातील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. तळागाळातील तसेच नोकरी करून शिक्षण घेऊन इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठ चांगला पर्याय ठरतो. मात्र, यूजीसीने मराठी-हिंदी भाषेसह 10 पदव्युत्तर अभ्यासक्रम विविध कारणांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहेे. 

एकीकडे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे यूजीसी मराठी अभ्यासक्रमांना परवानगी नाकारत आहे. हे विरोधाभासाचे चित्र दुर्दैवाने महाराष्ट्रात बघावयास मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नोकरी करून मराठी भाषेतून पीएच.डी. करण्याचे स्वप्न बघणार्‍या विद्यार्थ्यांना यूजीसीच्या आदेशामुळे वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन आणि कुलसचिव डॉ. दिनेश बोंडे यांचा यूजीसीकडे पाठपुरावा सुरू आहे. बंद केलेल्या दहाही अभ्यासक्रमांवर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा विद्यापीठाकडून व्यक्त केली जात आहे. 

..हे अभ्यासक्रम केले बंद

एम.ए मराठी, एम.ए हिंदी, बी. एस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बी.एस्सी (हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम स्टडी), बी.एस्सी (लॅबोरेटरी टेक्निशयन), बी.एस्सी (इंटेरियर डिझायनिंग), बी.एस्सी (फॅशन डिझायनिंग), बी.ए (योगा अ‍ॅण्ड नॅचरोपॅथी), एम.एस्सी (मॅथेमॅटिक्स)