Tue, Nov 19, 2019 03:12होमपेज › Nashik › धुळ्याच्या घटनेची मालेगावात पुनरावृत्ती; चौघांना मारहाण

धुळ्याच्या घटनेची मालेगावात पुनरावृत्ती

Published On: Jul 02 2018 10:14AM | Last Updated: Jul 02 2018 2:54PMमालेगाव : 

मुले पळविणार्‍या टोळीविषयीच्या अफवांचे लोण मालेगावातही पसरले आहे. या संशयी वातावरणात वावरणार्‍या चौघांना आझादनगर भागातील सनिउल्ला नगरमध्ये जमावाने मारहाण केली.  रविवारी (ता. १) रात्री ही घटना घडली.  जिंतूर (परभणी) येथून आलेले चौघे जमावाच्या हल्ल्यात जखमी झाले. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर जमावाने पोलिसांची व्हॅन उलटविली. छायाचित्रकार सय्यद अलीम यांनाही जमावाने मारहाण केली. 

मारहाण झालेल्या चौघा संशयितांना आझादनगर पोलिसांनी पोलिस नियंत्रण कक्षात नेले. तेथून कँम्प पोलिस ठाण्यात रात्री २ वाजता ठेवण्यात आले. संशयितांसमवेत दोन महिलाही होत्या. जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यातून किरकोळ दगडफेक झाली.

वाचा : ब्‍लॉग : 'सोशल' आंधळ्यांचं कृष्णकृत्य

‌जिंतूर (जि. परभणी) येथील एक दाम्पत्य रविवारी सायंकाळी आझादनगर भागात पैसे मागत फिरत होते. त्यांच्याजवळ त्यांचा एक लहान मुलगाही होता. आमच्याकडे पिक- पाणी नाही पैशांची मदत करा असे म्हणत ते फिरत होते. परंतु, काही लोकांना हे मुले पळविणा-या टोळीतील असल्याचा संशय आला. त्या संशयातून काही वेळातच हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले.काहींनी कुठलाही विचार न करता या महिलेच्या पतीस मारहाणीस सुरुवात केली. काहींनी समयसुचकता दाखवत दाम्पत्याला परिसरातील एका घरात कोंडून ठेवले. याठिकाणी दाखल झालेल्या माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या दाम्पत्याला ताब्यात घेतले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले हे पथकासह तातडीने हजर झाले. दंगा नियंत्रण पथकही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दाखल झाले. परंतु, अचानक दगडफेक सुरु झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. दीड वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.