Wed, Jun 03, 2020 20:24होमपेज › Nashik › जळगाव : बनावट टाटा मिठाची विक्री: दुकानादारावर कारवाई 

जळगाव : बनावट टाटा मिठाची विक्री: दुकानादारावर कारवाई 

Published On: Jul 22 2019 8:22PM | Last Updated: Jul 22 2019 8:22PM
जळगाव  ः प्रतिनिधी

चाळीसगाव शहरातील बस स्टँडमागे असलेल्या न्यू शुभम प्रोव्हिजनमध्ये बनावट मिठाची विक्री होत होती. दि. २२ जुलै रोजी पोलिसांसह आयआयडी सर्व्हीसेस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी छापा टाकून बनावट मिठाच्या पाकिटे असलेल्या ३९० गोण्या हस्तगत केल्या. दुकान चालकावर चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई येथील टाटा कंपनीचे आयोडीन युक्त मीठ नावाने शुभम प्रोव्हीजनवर बनावट मिठाची विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली. कंपनीने कॉपी राईट करार केलेले आयपी इनव्हेस्टीगेशन अँड डिटेक्टीव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमीटेड यांच्या अधिकाऱ्यांसोबत सदर दुकानातून मिठाच्या पिशव्या गोपनीय पद्धतीने विकत घेऊन त्यांची चाचणी टाटा कंपनीच्या प्रयोगशाळेत केली. चाचणीमध्ये सदर मीठ हे विना आयोडीन व शरीराला अपायकारक असल्याचे निष्पन्न आले. यानंतर कंपनीचे रिजनल मॅनेजर मोहंमद हुसेन चौधरी व लक्ष्मण विश्वकर्मा यांच्यासह चार जणांनी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक युवराज रबडे आणि पथकासह छापा टाकून दुकानातील बनावट मिठाची पाकिटे असणाऱ्या एकुण ३९० गोण्या ताब्यात घेण्यात आल्या. या बनावट मिठाची किंमत सुमारे ३ लाख ९० हजार इतकी आहे.

बनावट व खरे मीठ यांच्या पिशव्या या सारख्याच असुन खरे मिठाची पिशवी ही उजळ तर बनावट पिशवी ही त्यापेक्षा काळपट असल्याचे दिसून आले. याप्रकरणी बनावट मिठाच्या पिशव्या विक्री व साठवण प्रकरणी दुकान मालक विनोद पारसमल कोठारी याचेवर कॉपी राईट ॲक्ट ६५, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.