Tue, Jun 02, 2020 15:09होमपेज › Nashik › महिलेच्या प्रसंगावधानाने चेन स्नॅचर पोलिसांच्या ताब्‍यात 

महिलेच्या प्रसंगावधानाने चेन स्नॅचर पोलिसांच्या ताब्‍यात 

Published On: Dec 20 2017 9:31PM | Last Updated: Dec 20 2017 9:31PM

बुकमार्क करा

उपनगर वार्ताहर : प्रतिनिधी

नाशिक रोड येथील पायी चालणाऱ्या महिलेची पोत खेचणाऱ्या सोनसाखळी चोराला महिलेने खेचून खाली पाडले. जयभवानी रोडवर घडलेल्या या घटनेमुळे चोर पकडण्यास पोलिसांना मदत झाली आहे. विशेष म्हणजे सोनसाखळी चोर हा उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला  पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ आहे. नाशिकरोड व उपनगर  पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळून आज चेन चोरीच्या तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 

उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्‍या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी एकच्या सुमारास जयभवानी रोडवरील तुळजा भवानी मंदिराच्या कडेला फिर्यादी इंद्ररानी धनजंयकुमार सिंग (वय, 42, आनंदनगर, कदम लान्सजवळ, उपनगर) या चालल्या होत्या. त्‍यावेळी पांढऱ्या रंगाच्या प्लेजर स्कूटीवरील व्यक्तीने त्यांची सव्वादोन तोळ्याची चेन ओढून पळन्याचा प्रयत्न केला. यावेळी सिंग यांनी स्कूटी पकडली चोरट्याने त्यांना फरपटत नेले असतानाही सिंग यांनी गाडी सोडली नाही. यावेळी आरोपी गाडीवरून खाली पडला. त्याने गाडी तेथेच सोडून पोबारा केला. त्‍यानंतर सिंग यांनी उपनगर पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी गस्तीवरील पोलिसांनी कळवले. उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विजयकुमार मगर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सिंग यांच्याकडे विचारपूस केली. स्कूटीच्या नंबरवरुन माहिती घेऊन पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली.चेन स्नॅचिंग करणारा संशयित संजय रघुनाथ म्हसदे ( वय, 37, जयभवानीरोड, नाशिकरोड) याला ताब्यात घेत त्‍याच्याकडू महिलेचे मंगळसूत्र हस्तगत केले. 

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगची दुसरी घटना आज घडली. जेलरोडच्या नारायणबापूनगर येथील गोदावरी इमारतीजवळून मीराबाई गाडे (वय, 50) या पायी चालल्या असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी त्यांची तीन तोळे सोन्याची चेन ओरबडून पलायन केले. गाडे यांच्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तिसरी घटना सामनगाव येथे घडली. निलीमा विलास ताजनपुरे (29, ताजनपुरे मळा, सामनगाव रोड) या दुपारी मुलीला चेहेडी येथे शाळेत सोडवून परत येत असताना बाळू पेखळे यांच्या घराजवळ दुचाकीवरुन दोन युवक आले. त्यांनी त्यांची दोन तोळे सोन्याची चेन ओरबडून नेली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.