Mon, Jun 01, 2020 08:57होमपेज › Nashik › वैजापूरवासीयांच्या साकड्याने भुजबळ धर्मसंकटात

वैजापूरवासीयांच्या साकड्याने भुजबळ धर्मसंकटात

Published On: Jul 20 2019 2:13AM | Last Updated: Jul 19 2019 10:52PM
नाशिक : प्रतिनिधी
माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक माणिकराव शिंदे यांनी येवला मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची व्यक्त केलेली इच्छा तसेच वैजापूर मतदारसंघातून भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, असे साकडे तेथील कार्यकर्त्यांनी घातल्यानंतर  भुजबळ यांच्यासमोर धर्मसंकट उभे ठाकले आहे. भुजबळ आता येवला की वैजापूर यापैकी कोणत्या मतदारसंघाची निवड करतात, हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

आमदार भुजबळ यांनी 2004 मध्ये येवला मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि तेव्हापासून ते या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी विकासकामांचा धडाका लावत येवल्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. यावेळी मात्र त्यांचा मतदारसंघ नेमका कोणता असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण, लोकसभेच्या निवडणुकीचा धुराळा बसत नाही तोच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. इच्छुकांनी संधी मिळेल तेव्हा उमेदवारी करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शिंदे हेही याच इच्छुकांपैकीच एक असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने येवला मतदारसंघातून उमेदवारी म्हणून आधी वृत्तपत्रातून जाहिरात दिली. 

पक्षाने अर्ज भरून घेतले तेव्हा त्यातही त्यांनी अर्ज भरून दिला.या चर्चेने भुजबळांसमोर आव्हान निर्माण केलेले असतानाचे वैजापूर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी भुजबळ यांची येवल्यात भेट घेतली. भुजबळ यांनी वैजापूरमधून निवडणूक लढवावी म्हणून साकडेही घातले. अर्थात स्वत: भुजबळ नाही तर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने उमेदवारी करावी, असेही या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्याचवेळी भुजबळ यांनी येवल्यातूनच उमेदवारी करावी म्हणून तेथील समर्थकांनी गळ घातली.आता नेमका कोणता मतदारसंघ निवडायचा, यावर भुजबळ यांनी सध्या तरी कोणतेही भाष्य केलेले नाही. पण, एकीकडे शिंदे यांचे आव्हान, दुसरीकडे वैजापूरवासीयांचे साकडे, अशा धर्मसंकटात मात्र ते नक्कीच सापडले आहेत.