Fri, Jun 05, 2020 17:09
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › साहेब कर्ज कसे फेडू; शेतकरी महिलेची व्यथा 

साहेब कर्ज कसे फेडू; शेतकरी महिलेची व्यथा 

Published On: Dec 06 2018 8:36PM | Last Updated: Dec 06 2018 8:51PM
चांदवड (जि. नाशिक) : सुनील थोरे

साहेब बँकेचे कर्ज काढून शेतात कांद्याची लागवड केली होती. मात्र, पाऊसच झाल्याने विहिरीला पाणी उतरले नाही. कांदे जगवण्यासाठी शेतात ११ बोअरवेल मारले पण एकालाही पाणी लागले नाही. शेवटी शेतातील सर्व पाच एकर कांदे पाण्याअभावी जळून खाक झाले. अशा परिस्‍थितीत कांदे लावण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडू कसे? घरचा उदरनिर्वाह करायचा कसा? या चिंतेने रात्रीच्या वेळी झोप लागत नाही. शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? अशा व्यथा तालुक्यातील हरनूल येथील वैजयंती संतोष भोसले या शेतकरी महिलेने दुष्‍काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्‍या केंद्रीय पथकासमोर मांडली. आपली दैनिय अपस्‍था सांगत अतसाना भोसले यांना अश्रू अनावर झाले.  भोसले यांची व्यथा ऐकत असताना पथकातील सदस्यांना देखील यावेळी गैहिवरून आले.

चांदवड तालुक्यातील दुष्काळाची पाहणी केंद्रीय समितीच्या पथकाने गुरुवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास केली. या पथकाने तालुक्यातील हरनूल, हरसूल येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याअभावी जळालेले कांदा, टोमॅटो पिकांच्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्याच्या व्यथा ऐकूण घेतल्या. यात हरसूल येथील नामदेव त्र्यंबक रौंदळ या शेतकऱ्याच्या गट नंबर २२३/१ च्या क्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या मका (०.८०), टोमटो (०.४०), कांदा (०.४०) पाहणी केली. या पाहणीत केंद्रीय पथकाने चालू वर्षात शेतात कोणती पिके घेतली, पीक घेण्यासाठी झालेला खर्च, शेतात लागवड केलेल्या पिकांचे किती उत्पन्न झाले याची प्रत्यक्ष माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. तसेच हरनूल येथील वैजयंती संतोष भोसले या महिलेच्या शेतातील चिकू (०.२०), कांदा (१.०), मका (०.८०) या पिकांची पाहणी केली. यात शेतकऱ्यांच्या चर्चेत समाधानकारक पाऊस नसल्याने शेतीत लागवड केलेले संपूर्ण पिके पाण्याअभावी जळून गेल्याने लागवडीसाठी आलेला खर्च देखील वसूल झाला नसल्याचे भोसले यांनी सांगितले. शेतपिकांची लागवड करण्यासाठी या महिलेने दुगाव येथील भारतीय स्टेट बँकेकडून १ लाख २२ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले. घेतलेले कर्ज फेडायचे कसे अशी चिंता भेडसावत असल्याचे महिलेने केंद्रीय पथकास कथन केले.

या केंद्रीय पथकाच्या प्रमुख छावी झा, आर. डी. देशपांडे, ए. के. तिवारी, शालिनी सक्सेना, महाराष्ट्र शासनाचे सचिव एकनाथ डवले, नाशिकचे आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. प्रांताधिकारी भीमराव दराडे, सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, सिद्धार्थ भंडारे, प्रवीण महाजन, वासंती माळी, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, ज्योती देवरे, गटविकास अधिकारी हिरामण माणकर, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे, आदीसह महसूल, कृषी, बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा कांदा हमीभावाने खरेदी करा 
चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने कांद्याचे उत्पादन ८० टक्के घटले आहे. असे असताना कांदा पिकास अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल दराने कांदे विकावे लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शासनाने शेतकऱ्यांचा कांदा हमीभावाने खरेदी करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली आहे.

शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी 
पावसाअभावी खरीप सोबत रब्बीचे पिक हातातून गेले, जे पेरले होते ते उगले नाही, जे उगले ते करपून गेले, डोक्यावर कर्जाचा बोझा आहे, नदी - नाले सोबत विहिरी कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. जनावरांना चारा-पाणी नाही माणसांच्या हाताला काम नाही जगावे तरी कसे असा प्रश्न पडला आहे. अशा समस्या व व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय समितीच्या सदस्या समोर मांडून केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.