Tue, Nov 19, 2019 13:17होमपेज › Nashik › चणकापूर कालव्याची वहनक्षमता वाढणार

चणकापूर कालव्याची वहनक्षमता वाढणार

Published On: Sep 01 2019 1:49AM | Last Updated: Aug 31 2019 10:55PM
देवळा : वार्ताहर

चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता वाढविण्याच्या चार कोटी 82 लाख रुपयांच्या प्रस्तावास नियामक मंडळाची मंजुरी शुक्रवारी (दि.30) मिळाल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. यामुळे चणकापूर धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे कमी कालावधीत या कालव्याच्या माध्यमातून देवळा व मालेगाव या कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यातील तलाव, बंधारे या पूरपाण्याने भरणे शक्य होणार आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत चणकापूर उजवा कालव्याच्या 1 ते 38 किमीची वहनक्षमता वाढविण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. यामुळे या कालव्याची वहनक्षमता वाढविण्यात यावी ही जुनी मागणी पूर्णत्वास येणार आहे. देवळा व मालेगाव तालुक्यातील कमी पावसाच्या भागातील दोन लघुपाटबंधारे तलाव, 23 पाझर तलाव, 11 कोल्हापूर बंधारे या पूरपाण्याने भरून देणे शक्य होणार आहे. पुनद प्रकल्पांतर्गत असलेला चणकापूर उजवा कालवा 2000 पासून प्रवाहित असला तरी बहुतांश कालवा डोंगरालगत असल्याने कालव्यावरील भरावाची माथा पातळी संकल्पित माथापातळीपेक्षा कमी झाली आहे. यामुळे हा कालवा पूर्ण क्षमतेने वाहू शकत नाही. या कालव्याच्या मुखाशी 176 क्यूसेक वहनक्षमता असली तरी  प्रत्यक्षात ती 140 इतकीच मिळते आणि रामेश्वर धरणाजवळ तर ती 55 क्यूसेक इतकीच मिळते. यामुळे रामेश्वर धरण भरण्यास तीन आठवडे कालावधी लागतो. तो या वाढलेल्या वहनक्षमतेमुळे 10 दिवसांत भरणार आहे. देवळ्याचा पूर्व भाग व मालेगावचा दक्षिण भाग हा अत्यंत कमी पर्जन्यमान असणारा आहे. येथील पाण्याची गरज भागावी म्हणून या कालव्याची वहनक्षमता वाढविण्याची मागणी प्रत्येक कार्यक्रमात लोकप्रतिनिधीमार्फत होत असे. या कालव्याची वहनक्षमता वाढविण्याचे काम हे वाढ, विस्तार व सुधारणा या अंतर्गत होणार असून, विशेष दुरुस्तीकरिता नियामक मंडळाची मान्यता प्रदान करण्यात आल्याने या भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे.