Fri, Jun 05, 2020 18:35होमपेज › Nashik › मंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत व्यासपीठावरच तुफानी हाणामारी; माजी आमदाराला बुक्कलले (video)

मंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत व्यासपीठावरच तुफानी हाणामारी; माजी आमदाराला बुक्कलले (video)

Published On: Apr 10 2019 7:10PM | Last Updated: Apr 10 2019 7:52PM
जळगाव : पुढारी ऑनलाईन 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच भारतीय जनता पक्षामधील जळगाव जिल्ह्यामधील अंतर्गत यादवी समोर आली. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी माजी आमदार बी. एस. पाटील यांना मारहाण केली. यावेळी स्टेजकडे धावून आलेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी हात उगारला. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार बी. एस. पाटील यांनी वाघ कुटुंबियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पक्षातंर्गत गटबाजी आणि नाराजीनाट्यातून ही हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. 

अमळनेर शहरात भाजपच्या प्रचार मेळाव्यात सुरुवातीलाच माजी आ डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली ऊतरवण्याची मागणी करत आमदार स्मिता वाघ समर्थक व्यासपीठाकडे धावून गेले. यानंतर  बाचाबाचीला सुरुववात झाली. आणि नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत होवून कार्यकर्त्यांनी आणि स्मिता वाघ यांचे पती जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बी.एस.पाटील यांना जबर मारहाण केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुमारे १० मिनिटे हा वाद चालला. संतापात महाजन यांनी सर्वांना चिडून शांत केल्यानंतर मेळावा परत सुरू झाला

या सभेसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिवसेना आमदार गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळीच भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी माजी आमदार बी. एस. पाटील यांना जबर मारहाण केली. यावेळी स्वतः वाघ पाटील यांना लाथा मारताना दिसून येत होते. माजी आमदार बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही झटापट झाली. पोलीसही खाली पडले. गिरिश महाजन यांनी कार्यकर्त्यांना नियंत्रित करताना कार्यकर्त्यांना ढकलले. स्वतः गिरीश महाजन यांच्यावर कार्यकर्त्यांना खाली ढकलण्याची नामुष्की आली.

जळगावातील भाजपमधील खदखद काही दिवसांपूर्वीच समोर आली. काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही आपला उमेदवार बदलला. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उदय वाघ स्मिता वाघ यांचे पती आहेत.  काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने 3 एप्रिलला उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. भाजपने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. मात्र आता स्मिता वाघ यांच्याही तिकीटावर खाट मारुन, उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.