Sat, Aug 08, 2020 03:14होमपेज › Nashik › ब्लॅाग : जो जिता वही सिकंदर..

ब्लॅाग : जो जिता वही सिकंदर..

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 1:21AM

बुकमार्क करा

पेच-प्रसंग

सुधीर कावळे : आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून त्र्यंबकेश्‍वर आणि इगतपुरी नगरपालिका निवडणुकीकडे पाहिले जात आहे. काँग्रेसच्या आमदार निर्मला गावीत यांच्या बरोबरच शिवसेना आणि भाजपाचीदेखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक मंडळींनी भाजपाला जवळ केले आहे. त्यामुळे पालिकेवर काहीही करून सत्ता आणण्याचा चंग जसा या मंडळींनी बांधला आहे तद्वतच इतर पक्षाची मंडळी देखील देव पाण्यात बुडवून आहेत. एक मात्र, खरे यावेळची निवडणूक प्रस्थापित नेत्यांची शक्ती परीक्षा पाहणारी ठरणार आहे. त्यामुळे कुणाला सिकंदर ठरवायचे, याचा निर्णय सुज्ञ मतदार आज घेतील. एवढे मात्र नक्की!

दिवासीबहुल अशी ओळख  असणार्‍या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. बंडखोरांचे पीक, पक्षातंर्गत गटबाजी,  आयारामांना ऐनवेळी पावन करून घेण्याचा पक्षनेतृत्वाचा उतावळेपणा या सर्वांमुळे दोन्ही ठिकाणी मोठी चुरस पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत सामान्य मतदार कुणाच्या पारड्यात आपल्या मताचे दान टाकतो, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, देशात आणि राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला या दोन्ही ठिकाणी पुरेसे उमेदवारही देता आलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर होत असलेली ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम समजली जात आहे.

गोदावरीचे उगमस्थान आणि धार्मिक अधिष्ठान लाभलेले त्र्यंबकेश्‍वर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे बाराही महिने धार्मिक पर्वणी असते. शहराची लोकसंख्या जेमतेम 15  हजारच्या आसपास... मात्र, येथील उलाढाल एखाद्या मोठ्या शहरालाही लाजवेल अशी आहे. शहरात मोठ्या प्रमाणात चलन येत असले तरी विकासाच्या बाबतीत मात्र असलेला मागासलेपणा हटण्यास तयार नाही. त्याचे कारण म्हणजे येथे प्रत्येकाचा व्यक्तिगत विकास होतो; परंतु शहराचा म्हणून जो विकास होणे अपेक्षित होते तो आजतागायत झालेला नाही. येथील राजकारणाची तर्‍हादेखील मोठी न्यारी आहे. पक्ष बदलण्याची जणू काही येथे स्पर्धाच चालते.

मागील वेळेस सत्तेत आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सारेच नंतर भाजपावासी झाले होते. कधीकाळी येथील पालिकेवर सत्ता गाजवलेली राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज औषधालाही उरलेली नाही. या पक्षाला येथे उमेदवारदेखील न मिळाल्याने त्यांनी निवडणूकच न लढविण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. देशात आणि राज्यात अच्छे दिन आलेल्या भाजपामध्येही तिकिटासाठी मोठीच स्पर्धा निर्माण झाली होती. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले पराग दीक्षित यांच्या ऐवजी काँग्रेसमधून आलेले पुरुषोत्तम लोहगावकर यांना उमेदवारी दिल्यामुळे येथे भाजपातच बंडखोरी झाली आहे. आता रिंगणातून माघार नाही, या निर्धाराने पेटून उठलेल्या दीक्षित यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने येथे भाजपातच घमासान आहे. याशिवाय शिवसेनेकडून धनंजय तुंगार आणि काँग्रेसकडून सुनील अडसरे रिंगणात आहेत. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणार असल्याने नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस पाहावयास मिळत आहे.

खरे तर त्र्यंबक पालिका म्हणजे पूर्वी भाजपाचा बालेकिल्ला समजला जाई. मात्र, कुरघोडीच्या राजकारणात प्रत्येक पंचवार्षिकला येथे चालणार्‍या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कोण कुणाचा, याचा कधीच थांगपत्ता लागत नाही. आदल्या दिवशी एका पक्षात असणारा नेता दिवस उजाडताच दुसर्‍या पक्षात कधी जातो, हेदेखील त्र्यंबकवासीयांना समजत नाही. त्यामुळे येथील राजकारण म्हणजे एक प्रकारे अळवावरचे पाणी आहे. एकूण 17 जागांसाठी निवडणूक असली तरी एका जागेवर भाजपाने आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणत खाते उघडले आहे.शहरात राष्ट्रवादीचा पूर्वीइतका प्रभाव राहिलेला नाही. नगराध्यक्ष निवडणुकीतूनही राष्ट्रवादीने माघार घेतली आहे.

सेनेची ताकद येथे बर्‍यापैकी असली तरी भाजपाचा वाढता जनाधार पाहता इतर पक्षांचा येथे चांगलाच कस लागणार आहे. त्यातही नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरीमुळे भाजपाला मोठी ताकद पणाला लावावी लागणार असल्याने कदाचित या ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतो, अशी सध्याची स्थिती आहे. नगरसेवकांच्या फक्त सोळाच जागा निवडून द्यावयाच्या असल्यामुळे या सोळा जागांसाठी 54 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यंदा पालिकेच्या राजकारणात अपक्षांचेही मोठेच पीक आले आहे. 14 जण अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत तिरंगीच होणार आहे. त्यातही भाजपामधील बंडखोरीमुळे येथे काहीही घडू शकते, असे त्र्यंबकवासीयच बोलून दाखवित आहेत.

कोणतीही निवडणूक म्हटली तर पैशांचा बेसुमार वापर हे समीकरणच दृढ झालेले पाहावयास मिळते. यावेळच्या निवडणुकीतही पैशांचा अमाप वापर झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्र्यंबकराजा कुणाला पावतो, हे निकालानंतरच समजेल. त्र्यंबकबरोबरच इगतपुरी पालिका निवडणूकही बंडखोरीमुळे चांगलीच गाजत आहे. तब्बल 25 वर्षे शिवसेनेने येथील सत्ता अबाधित ठेवली आहे. मात्र, यंदा शिवसेनेमध्येच नगराध्यक्ष पदाच्या तिकिटावरून घमासान झाले आणि त्याची परिणती बंडखोरीत झाली. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले महेश शिरोळे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून बंडाचा झेंडा हाती धरत शिवसेनेपुढेच आव्हान उभे केले आहे.

त: शिरोळे हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असून, नगरसेवकसाठी 12 ठिकाणी उमेदवार उभे करून सेनेला  सोपी वाटणारी लढत अवघड करून टाकली आहे. भाई म्हणून परिचित असलेले माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी तब्बल 25 वर्षे येथील सत्ता राखली आहे. नगरपालिका एके नगरपालिका फक्त एवढेच राजकारण करणार्‍या संजय इंदुलकर यांनी पक्षांतर्गत राजकारणात इतर कुठेच लक्ष घातलेले नाही. पालिका वर्तुळाबाहेरच्या राजकारणाचा सोस कधीच केला नाही. मागील पंचवार्षिकला राष्ट्रवादीने मोठी ताकद पणाला लावूनही इंदुलकर यांचीच सरशी झाली होती. यावेळी मात्र, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेेले शिरोळे यांनी त्यांच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्यामुळे इंदुलकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेला 11 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत निवडणूक लढविल्यामुळे त्यांना आठ जागा मिळाल्या होत्या.

राष्ट्रवादीचे फिरोज पठाण यांनी त्यावेळी इंदुलकरांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र, तरीही सरशी इंदुलकरांचीच झाली होती. राष्ट्रवादीपेक्षा तीन जागा सेनेला जास्त मिळाल्या होत्या. यावेळी मात्र, पठाण यांनीच वातावरणाचा अंदाज घेत भाजपाचे कमळ हाती घेतल्याने राष्ट्रवादीला शहरात कुणी वालीच उरलेला नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवारच रिंगणात नाही. भाजपाने राष्ट्रवादीतून आलेले फिरोज पठाण यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे बद्रीनाथ शर्मा, भारिपचे बाळू पंडित आणि शिवसेनेचे बंडखोर महेश शिरोळे यांनी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार प्रचार मोहीम राबवित सेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा चंग बांधला आहे.इगतपुरी शहरात सेनेची तब्बल 25 वर्षांपासून सत्ता आहे. मात्र, शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही, असा प्रचाराचा मुद्दा बनविल्यामुळे सेनेची काहीशी गोची झाली आहे.

आजही शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तसा पाहिल्यास गंभीरच आहे. येथे पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तीन ते साडेतीन हजार मिमी पाऊस येथे होतो. शिवाय इगतपुरी तालुका नाशिकसह ठाणे, मुंबई, नगर आणि मराठवाडा या भागाला पाणीपुरवठा करतो. असे असतानाही इगतपुरीमधील नागरिकांना आजही आठवड्यातून केवळ दोनच वेळा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे भाकरी फिरवली नाही तर ती करपते, या न्यायाने भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचा प्रचार बहुजन विकास आघाडीने चालविल्यामुळे  कुणाची शिट्टी वाजते, याबद्दल शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भाजपालाही या ठिकाणी प्रभावी चेहरा नव्हता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या फिरोज पठाण यांना गळाला लावले. पठाण भाजपात गेल्यामुळे राष्ट्रवादीचे मात्र मातेरे झाले आहे. या पक्षाला येथे कुणी वालीच आता उरलेला नसल्याने त्यांना नगराध्यक्ष पदासाठी तर दूरच, पण नगरसेवक पदासाठीदेखील उमदेवार मिळाला नाही.

अशीच अवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीदेखील पाहावयास मिळत आहे. नाशिक महापालिकेतून मनसेचे इंजिन साइडला लागल्यानंतर या पक्षाची अवस्था जिल्ह्यात काहीशी खिळखिळी झाली आहे. त्याचा प्रत्यय त्र्यंबकेश्‍वरपाठोपाठ इगतपुरीतदेखील येत आहे. इगतपुरीतही या पक्षाची अवस्था दयनीय आहे. शहरात जे नेते उरले आहेत, त्यांचा काही फारसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे पक्षाने निवडणूक लढविण्याऐवजी शांत राहणेच पसंत केले आहे. इगतपुरीमध्ये आरपीआयची ताकददेखील बर्‍यापैकी आहे. मात्र, आरपीआयदेखील येथे विभागली गेली आहे. काही जण भाजपाकडे, तर काही शिवसेनेकडे असल्याने या विभागलेल्या परिस्थितीचा फायदा नेमका कुणाला होतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे.

भाजपाने या  दोन्ही ठिकाणी मोठी ताकद उभी केली असून, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचारसभा घेतली, तर आजपर्यंत शिवसेनेतील कोणत्याच मोठ्या नेत्याची सभा घेण्याची गरज न पडलेल्या इुंदलकरांनाही यावेळी मात्र आदेश बांदेकर, राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सभा घेण्याची गरज पडली. यावरूनच येथील लढत वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज सर्वांनाच आलेला आहे. इगतपुरीमध्ये काँग्रेसने सोलापूरच्या आ. प्रणिती शिंदे यांना प्रचाराला आणून स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांच्या बरोबरच शिवसेना आणि भाजपाचीदेखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक मंडळींनी भाजपाला जवळ केले आहे. त्यामुळे पालिकेवर काहीही करून सत्ता आणण्याचा चंग जसा या मंडळींनी बांधला आहे. तद्वतच इतर पक्षाची मंडळीदेखील देव पाण्यात बुडवून आहे. एक मात्र खरे की, यावेळची निवडणूक प्रस्थापित नेत्यांची शक्तिपरीक्षा पाहणारी आहे. त्यामुळे कुणाला सिकंदर ठरवायचे, याचा निर्णय सूज्ञ मतदार आज घेतील, एवढे मात्र नक्की!