Mon, Jul 06, 2020 21:48होमपेज › Nashik › निसर्ग सौंदर्याने बहरला इगतपुरी तालुक्याचा परिसर(Video)

निसर्ग सौंदर्याने बहरला इगतपुरी तालुक्याचा परिसर(Video)

Published On: Jul 29 2019 1:40PM | Last Updated: Jul 29 2019 2:32PM

फोटो :  इगतपुरी परिसरातील धबधधबे पर्यटकांना खुणावत आहेत.नाशिक : प्रतिनिधी

मागील आठवड्यापासुन नाशिक जिल्‍ह्‍यातील इगतपुरी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील धरणातील पाणी साठ्‍यात कमालीची वाढ झाली आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी डोंगर ऊतारावरून पाण्याचे धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तालुक्यात भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा धरण, दारणा धरण, भाम धरण आदी ठिकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे.

वनराईने नटलेला भावली धरण परिसर

इगतपुरी तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा भावली धरण परिसर...निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई...मंद-धुंद करणारा पाऊस... क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण...घनदाट वृक्षांची छाया...मुक्तहस्ते खळखळणारे धबधबे...खोल खोल दऱ्या.. चरणारी गायी गुरे...किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे...रानफुलांचा मंद -मंद सुगंध...शेकडो पर्यटकांचे असे अनेकानेक अंगांनी नटुन -थटून स्वागत करणारा भावली धरण परिसर आहे.

या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून सुट्टीच्या काळात लाखो पर्यटक भेट देऊन आनंद घेत आहेत.

वन डे मॉन्सून डेस्टिनेशन अशोका धबधबा 

अशा वातावरणात पावसाळी पर्यटनाचा आनंद काही औरच! आणि त्यातही धबधब्याखाली चिंब भिजायला कुणाला आवडणार नाही. त्यासाठीच पावसाळी पर्यटनासाठी त्यातल्या त्यात योग्य वातावरण आणि योग्य ठिकाणाचा शोध हौशी पर्यटकांकडून घेतला जात आहे. अशा या उपावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर कसारा घाटातील विहिगाव ( ता.शहापूर ) येथील अशोका धबधबा हा वन डे मॉन्सून डेस्टिनेशनच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. नाशिक आणि मुंबई परिसरातील पर्यटक सध्या वन डे पिकनिकसाठी अशोका धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

गेले काही दिवस धो -धो बरसणाऱ्या पावसामुळे विहिगावचा हा अशोका धबधबा ओसांडून वाहत असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने इथे येवून धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याची मजा लुटत आहेत. दिवसभरात जवळपास पाचशे पेक्षा जास्त पर्यटक याठिकाणी भेट देवून धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटतांना दिसत आहेत. सर्वत्र दाट वनराई आणि त्यात डोंगराच्या अगदी पायथ्याला अगदी शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील हा अशोका धबधबा सध्या निसर्गप्रेमी पर्यटकांना चांगलाच आकर्षित करतांना दिसत आहे. 

कसारा घाट परिसर हा पावसाळयात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा आनंद देणारा परिसर आहे. गेले काही दिवस मनसोक्त बरसणाऱ्या पावसाने घाट परिसरात सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि बहारदार हवा अनुभवायला मिळत आहे. पावसाळी पर्यटनस्थळाच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी अशोका धबधबा हा उत्तम पर्याय असून मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी, नवी मुंबई इथल्या पर्यटकांसोबतच नाशिक शहर आणि परिसर त्याचबरोबर स्थानिक इगतपुरी शहर आणि  कसारा परिसरातील पर्यटकही या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतांना दिसत आहेत.