होमपेज › Nashik › नाशिक : मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

नाशिक : मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

Published On: Sep 12 2019 2:00PM | Last Updated: Sep 12 2019 9:04PM

नाशिकमध्ये मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभनाशिक : प्रतिनिधी

शहरातील वाकडी बारव येथून गुरूवारी (दि.12) दुपारी साडेबारा वाजता मुख्य गणपती विसर्जन मिरवणुकीला पारंपारिक वाद्यांच्या गजरात प्रारंभ झाला. यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत तब्बल 21 सार्वजनिक मंडळांचे रथ सहभागी झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ यासारख्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

वाकडी बारव येथे पालकमंत्री गिरिष महाजन यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या रथासमोर नारळ वाढविण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे,  देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, गटनेते जगदीश पाटील, गजानन शेलार, नगरसेवक हेमलता पाटील, विनायक पांडे, सुनील आडके, समीर शेटे, गिरीष पालवे, रामसिंग  बावरी, पद्माकर पाटील,  मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रारंभानंतर मिरवणूक वाकडी बारव-दूध बाजार, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईट, रेडक्रॉस सिग्नल, एमजी रोड, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा मार्गे गोदा घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

यंदाच्या वर्षी डीजेवर बंदी असलेल्या सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांना पसंती दिली होती. ढोल पथकांसह लेझिम पथकाने उपस्थितांचे डोळ्याचे पारणे फेडले. पारंपारिक वाद्यांवर अबालवृध्दांनी ठेका धरला होता. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गुलालला फाटा देण्यात आल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले.

पालकमंत्र्यांनी धरला ठेका

विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरिष महाजन यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला. त्यांच्या जोशपुर्ण आणि लयबध्द स्टेपने ढोल पथकाचा उत्साह वाढविला. ढोल वाजवत महाजन यांनी मिरवणुकीचा मनसोक्त आनंद लुटला. काही कार्यकर्त्यांसह नृत्य करण्याचा मोह महाजन यांना आवरला नाही.

नाशिकमध्ये मुख्य विसर्जन मिरवणुकीचे LIVE अपडेट :

काशी विश्वनाथ येथुन आलेल्या ३५ लोकांच्या डमरु पथक आकर्षण ठरले.  

महापालिकेचा  पहिला गणपती धुमाळ पाँईट येथे असुन वाकडी बारव येथुन १० नंबरचा मानाच्या राजाचे आगमन झाले आहे.

अजुन ११ मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून मिरवणूक मार्गाची पाहणी. 

पावसाचे आगमन; गणेशभक्तांचा उत्साह कायम

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजाचे आगमन झाले आहे.  मुख्य विसर्जन मिरवणुकीला रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. तरीही गणेशभक्तांचा उत्साह कायम आहे. मिरवणुकीत विविध मंडळांकडून पारंपरिक मर्दानी खेळ सादर केले जात आहेत. तसेच गुलालवाडी व्यायामशाळेचे चिमुकल्यांचे लेझीम पथक, यशवंत व्यायाम शाळेच्या चिमुकल्यांचे मल्लखांब प्रात्यक्षिक लक्ष वेधून घेत आहेत.

नाशिकमध्ये मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

नाशिकमध्ये मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले गुलालवाटी लेझिम पथक