Fri, Sep 18, 2020 20:22होमपेज › Nashik › अखेर ठरलं! : छगन भुजबळ 'घरवापसी' करणार

अखेर ठरलं! : छगन भुजबळ 'घरवापसी' करणार

Published On: Aug 31 2019 4:13PM | Last Updated: Aug 31 2019 4:14PM

छगन भुजबळओझर (नाशिक)  : वार्ताहर 

होणार होणार म्हणून गेले अनेक दिवस चर्चा असलेल्या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. छगन भुजबळ उद्या (ता.१) दुपारी १२ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक बातमी हाती आली  आहे. या प्रवेशाबाबत काही प्रमुख कार्यकर्त्यांना थेट संपर्क साधला जात असून यावेळी छगन भुजबळ यांच्याकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. 

नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात कार्यकर्त्यांचे मोठं संघटन असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, भुजबळ यांच्याकडून वारंवार या चर्चा फेटाळल्या जात होत्या. मात्र, आता भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. छगन भुजबळ हे शिवसेना प्रवेशावेळी आपली ताकद दाखवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर पोहोचणार आहेत. यावेळी भुजबळ यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण आणि किती आमदार प्रवेश करणार याची अद्याप माहीती मिळाली नसून भुजबळ यांच्या समर्थकांकडून प्रमुख कार्यकर्त्यांना उद्याच्या प्रवेशासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.  

छगन भुजबळ यांच्या शिवसेना पक्षप्रवेशा बाबत सेनेच्या काही वरीष्ठ पदाधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी देखील भुजबळ यांच्या सेना प्रवेशा बाबत दुजोरा दिला.  भुजबळ यांच्या सेना प्रवेशाने नाशिक जिल्ह्यासह राज्यात देखील शिवसेनेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत सेनेच्या वर्तुळात व्यक्त होत आहे. भाजपने शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजप प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर भुजबळ यांच्या सेना प्रवेशा बाबत हालचालींना वेग आला.

भुजबळ यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाबाबत शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंत्री आणि भुजबळ यांच्या निकटवर्तीयांची ठाणे येथील महापौर निवासस्थानी गेल्याच आठवड्यात एक बैठक झाल्यांचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. ही बैठक नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्याच एका आमदाराच्या मध्यस्तीने पार पडल्याचे देखील समजते.