Fri, Jun 05, 2020 04:26होमपेज › Nashik › राजा-राजपुत्राच्या कथेद्वारे आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीचे संकेत

राजा-राजपुत्राच्या कथेद्वारे आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीचे संकेत

Published On: Jul 20 2019 2:13AM | Last Updated: Jul 19 2019 9:06PM
मालेगाव : प्रतिनिधी

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी मालेगावी दाखल झाली. यावेळी ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात प्रत्यक्ष उमेदवारीच्या विषयाला स्पर्शही केला नाही. मात्र, राजा- राजपूत्र आणि जंगल कथेचा संदर्भ देत ‘लहानातील लहान घटकाचा आवाज आणि भावना जाणणाराच चांगला राजा होऊ शकतो’, असे उदाहरण देत ‘मी तळागाळातील घटकांच्या भावना जाणून घेण्यासाठीच महाराष्ट्र दौर्‍यावर निघालो आहे’, असे स्पष्टीकरण देत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे अधोरेखित केले.

जळगावमधून सुरू झालेली जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी मालेगावात दाखल झाली. भव्य दुचाकी रॅलीने ठाकरे मालेगाव बाजार समितीतील सभास्थळी आले. याठिकाणी त्यांच्या हस्ते अतिक्रमण नियमानुकूल योजना तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण झाले. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र यात्रेवर निघालोय. त्यात सर्व घटकांच्या भावना जाणून घेत आहे. जनमनाचा हा आवाज ऐकून घेत, त्याचेच प्रतिबिंब शिवसेनेच्या वचननाम्यात उमटेल, तसेच ही यात्रा केवळ मुख्यमंत्री नव्हे तर नवीन महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे.' 

यावेळी ठाकरे यांनी, नव महाराष्ट्र घडविण्याच्या उद्दीष्टासाठी जनतेची साथ मागितली. जनसमुदायाने हात उंचावून ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘आदित्य ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या गगणभेदी घोषणांनी अनुमोदन दिले.

प्रत्यक्ष विधानसभा उमेदवारीच्या विषयाला स्पर्शही न करता ठाकरे यांनी लहानातील लहान घटकाचा आवाज ऐकणारा, जाणणाराच चांगला राजा होऊ शकतो, असे उदाहरण देत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरल्याचा संकेत दिला. 

बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी ‘भाजप अध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काहीतरी ठरल्याच्या चर्चेचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांना मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून केवळ अर्ज दाखल करावा, लाखाच्या मताधिक्क्याने विजयाची ग्वाहीयुक्त विनंती केली.  

दादा भुसे म्हणाले की, महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने बघतोय. समुद्राला वाहून जाणारे पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्व वाहिनी करुन उत्तर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याची आवश्यकता आहे. यासह विविध विकासकामांच्या पुर्तीसाठी तुम्ही ‘मालेगाव बाह्य’मधून उमेदवारी करावी, सर्वपक्षियांची बैठक लावून विकासासाठी तुम्हाला अविरोध निवडून आणू. किंतु-परंतु झाले तरी किमान लाखभर मताधिक्क्याने विजय मिळवून देऊ.