Tue, Jun 02, 2020 15:07होमपेज › Nashik › जनतेच्या आशीर्वादासाठी राज्यात फिरत आहे : आदित्य ठाकरे 

'जनतेच्या आशीर्वादासाठी राज्यात फिरत आहे'

Published On: Jul 19 2019 4:32PM | Last Updated: Jul 19 2019 3:42PM
धुळे : प्रतिनिधी

नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण राज्यात फिरत आहे. राज्य प्रदुषणमुक्त, दुष्काळ व बेरोजगारीमुक्त असेल, असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धुळ्यात केले. 

धुळ्यात आज (ता.१८) शिवसेनेकडून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. आज सकाळी दसरा मैदानाजवळील विठ्ठल मंदिरापासून मोटार सायकल रॅलीने या यात्रेस सुरुवात करण्यात आली. यावेळी चाळीसगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे पुजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख बबन थोरात, माजी आमदार शरद पाटील उपस्थित होते. 

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेचा देव जनतेमध्ये आहे. आज धुळ्यासह राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. पण शिवसेना अशा स्थितीत जनता व शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी आहे. राज्यात कर्जमुक्ती आवश्यक असल्याने सेनेने हा प्रश्न लावून धरला आहे. अजुनही काही ठिकाणी कर्ज माफीचे प्रमाणपत्र मिळून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत. पिक विम्याचे पैसेही न मिळाल्याने शिवसेनेने आंदोलन पुकारले आहे. आगामी काळात सरसकट कर्ज मुक्ती हाच सेनेचा कार्यक्रम रहाणार आहे. यासाठी जनतेचा आशीर्वाद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीमधे धुळे ग्रामीणचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी पुन्हा महाराष्ट्र शिवसेनेचाच असा नारा दिला.  राऊत म्हणाले की, धुळ्यात आजच्या यात्रेनिमित्ताने भगवे वातावरण तयार झाले असून या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांची लाटच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभेत तुम्ही व राज्यात आम्ही असे ठरले असून या राज्यात भगवा झेंडा हा सेनेचाच रहाणार आहे. या झेंडयाला हात लावण्याची हिंमत कुणातही नाही. या झेंड्याचा दांडा देखील मजबूत असल्याचे सांगत त्यांनी नाव न घेता मित्र पक्षाला इशारा दिला.