जळगाव : पुढारी ऑनलाईन
भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये विविध गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यावेळी तडीपार गुन्हेगार हेमंत पैठणकर हा शहरात मिळून आल्यामुळे त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले आहे.
बाजारपेठ व भुसावळ सिटी पोलीस ठाणे हद्दीत ७ रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये संपूर्ण शहरांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार, पकड वारंटमधील गुन्हेगार, स्टँडिंग वॉरंट त्याचप्रमाणे हिस्ट्री शीटर व अन्य विविध गुन्हेगार चेक करण्यात आले. त्यासाठी संपूर्ण शहरात एकंदरीत चार टीम तयार करण्यात आलेल्या होत्या. त्याशिवाय RCP पथकदेखील यासाठी वापरण्यात आले होते. रात्री नऊ वाजता कोंबिंग ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली आणि पहाटे तीन वाजता ही कारवाई थांबवण्यात आली.
सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्याच्यादृष्टीने त्याचप्रमाणे नागरिकांच्या मालमत्तेच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे.
यापुढेही भुसावळ शहरांमध्ये गुन्हेगारीवर वचक ठेवण्याच्या दृष्टीने अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे.