Wed, Jun 03, 2020 21:35होमपेज › Nashik › मुंबई-नाशिक महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा!

मुंबई-नाशिक महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा!

Published On: Mar 20 2018 1:59PM | Last Updated: Mar 20 2018 1:59PMशहापूर : वार्ताहर

मुंबई-नाशिक-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील भिवंडी ते सोनावळे फाटा ते  कसारा चिंतामणवाडी या महामार्ग पोलिसांच्या 72 किलोमीटरच्या कार्यक्षेत्रात जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांत एकूण 47 अपघात झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. या अपघातांत एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असून, 14 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास आवटे यांनी दिली.

दरम्यान, 7 विनादुखापतीचे अपघात झाल्याचेही त्यांनी सांगितले.  निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवणे, हुल देणे, वाहनांशी स्पर्धा करणे, उभ्या वाहनास मागून धडक देणे, मद्यपान करून वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे यासह वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या अशा बहुतांश कारणांमुळे अपघात होत आहेत. तसेच महामार्गावरील नियम तोडून अनधिकृतपणे रस्त्याचे डिव्हायडर कटींग करून सोयीचा रस्ता तयार करणे यामुळेही अपघातांच्या संख्येत भर पडत असल्याचे आवटे यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक आवटे पुढे म्हणाले की, सोनावळे फाटा भिवंडी ते चिंतामणवाडी कसारा हे 72 किलोमीटरचे क्षेत्र शहापूर अंतर्गत येत असून या लांबलचक पल्ल्याच्या कार्यक्षेत्रात अधिकार्‍यासह केवळ 7 कर्मचारीच कार्यरत आहेत. यात एक सहायक पोलीस निरीक्षक, एक जमादार, दोन हावलदार, दोन पोलीस शिपाई, एक हावलदार असा तुटपुंजा कर्मचारी वर्ग आहे. 39 पोलीस कर्मचारी पदे मंजूर असताना फक्त 7 कर्मचारी येथे नेमण्यात आले आहेत.

याशिवाय महामार्ग गस्तीसाठी एक जीप व एक मोटारसायकल एवढीच साधन सामुग्री आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने या पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांना काम करणे फार जिकीरीचे होत असल्याचे आवटे यांनी सांगितले. त्यामुळे वाढत्या अपघातात पोलीसांची अपुरी संख्या हेही प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Tags : Mumbai Nashik national highway, accident