Sat, Nov 16, 2019 07:56होमपेज › Nashik › जळगाव : उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

Published On: Jul 05 2019 8:20PM | Last Updated: Jul 05 2019 7:59PM
जळगाव : प्रतिनिधी

प्रयोगशाळा परिचर पदाच्या मान्यता आदेशावर सही करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून उच्चशिक्षण विभागातील एका वरीष्ठ लिपिकाला ५० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई धुळे लाच लुचपत विभागाने केली असून पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे धुळे येथील महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कामावर आहेत. त्याच्या पदाला सहसंचालक उच्चशिक्षण विभागाने मान्यता दिली नाही म्हणून तक्रारदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 10 जानेवारी रोजी निकाल लागल्यानंतर रिक्त पदावर प्रयोगशाळा परिचर पद भरण्यासाठी तक्रारदार यांनी 14 मार्च रोजी सहसंचालक उच्च शिक्षण, जळगाव विभागातील वरीष्ठ कर्मचारी अतुल श्रीकांत सहजे (वय, 49. रा. संभाजी नगर, महाबळ परीसर ) यांची भेट घेवून प्रयोगशाळा परिचर पदावर मान्यता आदेशावर सहसंचालक यांची स्वाक्षरी करून आदेशाची प्रत मिळावी यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केली.

त्यानुसार तक्रारदार यांनी धुळे लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली. आज धुळे एसीबी विभागाने सहसंचालक उच्चशिक्षण विभागात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सापळा रचून तक्रारदारकडून लोकसेवक तथा वरीष्ठ कर्मचारी अतुल सहजे यांनी 50 हजार रूपये घेवून टेबलाच्या ड्राव्हरमध्ये ठेवले असता लाच लुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडले. पुढील कारवाईसाठी सहजे यांना जळगाव एसीबी विभागात नेण्यात आले.