Wed, Jun 03, 2020 20:41होमपेज › Nashik › आचारसंहितेत लटकले बंधारे अन् महिलांच्या योजना

आचारसंहितेत लटकले बंधारे अन् महिलांच्या योजना

Published On: Sep 22 2019 1:33AM | Last Updated: Sep 22 2019 1:33AM
नाशिक : प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अखेर लागू झाली असून, त्यात जिल्हा परिषदेची  कोट्यवधी रुपयांची कामे अडकली आहेत. विशेष म्हणजे, त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावर साकारण्यात येणार्‍या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळाही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला आहे. 

आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने दरम्यानच्या काळात विकासकामे ठप्प राहतात. स्थायी तसेच सर्वसाधारण सभांमधून सदस्यांनी अनेकदा आचारसंहितेचे स्मरण करून देत कामकाजाला गती देण्याची मागणी केली होती. प्रसंगी आक्रमक पवित्रा घेऊन प्रशासनाला कामाला लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तरीही सर्वच्या सर्व कामे आचारसंहितेपूर्वी मार्गी लावणे प्रशासनाला शक्य झाले नाही. बंधार्‍यांची 34 कामे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. चार कामे निविदास्तरावर असून, 30 कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पण, आता ना निविदा प्रक्रिया राबविता येणार ना प्राप्त निविदा उघडता येणार. जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची ही कामे आहेत.

24 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल तेव्हाच आचारसंहिता शिथिल होईल. तोपर्यंत बंधार्‍यांच्या कामांना ब्रेक लागला आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षणाच्या योजनाही रखडणार आहेत. 15 लाख रुपयांच्या या योजना तांत्रिक मान्यतेसाठी आयुक्‍तांकडे पाठविण्यात आल्या आहेत. कराटे प्रशिक्षणासंदर्भातील फाइल कार्यारंभ आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावर उभारण्यात येणार्‍या जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळाही रखडला आहे. अल्प मुदतीच्या निविदेसंदर्भात सरकारी आदेश निर्गमित होईल, या आशेवर असलेल्या प्रशासनाने दीर्घमुदतीची निविदा प्रक्रिया राबविण्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे आता 24 ऑक्टोबरनंतरच भूमिपूजन सोहळा आयोजित करावा लागणार आहे.