पंचवटी : वार्ताहर
पंचवटीतील रामवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास तीन हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून एका युवकावर धारदार हत्यारांनी हल्ला करीत हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर रमेश नागरे (26, रा. रामवाडी) असे मयत युवकाने नाव आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, दोन जण फरार आहेत. यात एका अल्पवयीनाचा समावेश आहे. महिनाभरात दोन खुनाच्या घटनांनी पंचवटीकरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी (दि.10) मध्यरात्रीच्या सुमारास किशोर हा रामवाडीतील आदर्शनगर येथील मोकळ्या मैदानावर बसलेला होता. यावेळी तेथे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने किशोरच्या डोक्यात, मानेवर, पाठीवर सपासप वार केले. यात वर्मी घाव लागल्याने व अतिरक्तस्त्राव झाल्याने किशोर याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी प्रचंड अंधार असल्याने त्याचा फायदा घेत हल्लेखोरांनी हल्ला करून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह फॉरेन्सिक लॅब आणि क्विक रिस्पॉन्स टीमने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच, फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरील रक्ताचे नमुने घेत पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांनी शुभम निवृत्ती पांढरे (रा. लोणार लेन) या संशयितास अटक केली असून, अविनाश उर्फ वामन्या रावसाहेब वाणी आणि एक अल्पवयीन संशयित अद्यापही फरार आहे. दोन महिन्यांपूर्वी किशोर व संशयितांमध्ये मेनरोड येथे काही कारणावरून वाद झाले होते. याच कारणावरून संशयितांनी किशोर याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
भाऊ धावून आला पण...
मयत किशोर याचा मोठा भाऊ सचिन नागरे याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, घरासमोरील मैदानामधून सचिन.. सचिन.. असा आवाज आला असता त्या दिशेने धावत गेलो. त्यावेळी त्याठिकाणी काही अज्ञात इसम हे किशोरवर धारधार शस्त्राने वार करीत होते. किशोरच्या मदतीसाठी धावलो. परंतु मारेकर्यांनी अंधारातून दुचाकीवरून पळ काढल्याचे सचिनने सांगितले. सचिनच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात मारेकर्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.