Tue, May 26, 2020 11:51होमपेज › Nashik › डंपरच्या धडकेत युवक ठार; वाहनांची जाळपोळ

डंपरच्या धडकेत युवक ठार; वाहनांची जाळपोळ

Published On: Jul 23 2019 1:18AM | Last Updated: Jul 22 2019 11:03PM
मालेगाव : प्रतिनिधी

मालेगाव-कुसुंबा रोड रस्ता कामावरील डंपरने रविवारी (दि.21) सायंकाळी वड तलावाजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकीवर उभ्या असलेल्या तरुणाला चिरडले. त्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त वाहनासह ठेकेदाराच्या प्रकल्पातील वाहनांची जाळपोळ केल्याचे करंजगव्हाण गावात तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांसह फौजफाटा तैनात झाल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, अपघातप्रकरणी डंपर चालकाला वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अटक केली आहे.

मालेगाव-कुसुंबा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर खडी वाहतूक करणारा डंपर (एम. एच. 09 एचएच 2650) मालेगावकडून दहिदीच्या दिशेने जात होता. करंजगव्हाण शिवारातील वड तलावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला प्रविण दादाजी जाधव (34) हा एमएच 41 ए. जे. 2810 या उभ्या दुचाकीवर बसलेला होता. भरधाव वेगात आलेल्या डंपरने प्रथम ट्रॅक्टरला धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर थेट जाधव यांच्यावर चालून गेला. पुढील चाकाखाली दबून जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक प्रविण उत्तम पवार (37, रा. सातमाने ) हा घटनास्थळावरुन फरार झाला. ग्रामस्थांनी जाधव यांचा मृतदेह बाजुला काढत मालेगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविला. 

दरम्यान, अपघात स्थळी जमाव होऊन संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त वाहनाला पेटवून दिले. इतरही वाहनांना जाळपोळ करण्यात आली. घटनेची खबर मिळतानच पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, रत्नाकर नवले यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत करंजगव्हाणमध्ये तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान, सोमवारी सायंकाळी उशिरा फरार वाहनचालक पवारला अटक करण्यात आली.