Tue, Jun 02, 2020 14:47होमपेज › Nashik › दोन लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण

दोन लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 05 2018 2:13AMनाशिक : प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील पांगारणे जवळील गोंदुणे येथील प्रकाश नानू गावित (29) या युवकाचे 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान पांगारणे येथील त्रिफुलीवरून अपहरण करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली. अपहृत युवकाने स्वतःची सुटका करून घेत सुरगाणा पोलीस ठाण्यात अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश गावित हा 28 ऑगस्टला उंंबरठाण येथून आठच्या सुमारास जीजे 21 एएल 9456  क्रमांकाच्या दुचाकीवरून गोंदुणे येथे जात होता. त्यावेळी पांगारणे येथील त्रिफुलीवर एक तवेरा गाडीत बसलेल्या आठ संशयितांनी प्रकाशला अडवून आम्ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आहोत, तू दमणची दारूची अवैध वाहतूक करतोस असे म्हणून गाडीत बसवण्यास सांगितले. प्रकाशने गाडीत बसण्यास नकार दिल्याने संशयितांनी त्यास जबरदस्ती गाडीत बसवून उंबरठाण मार्गे सूर्यगड येथे नेत मारहाण केली.

तेथून सुरगाणा येथे प्रकाशला नेत त्याचा भाऊ दिनेश गावित याला फोन करून तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे. तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर दोन लाख रुपये सुरगाणा येथील पेट्रोलपंपाजवळ घेऊन ये, असे संशयितांनी धमकावले. दिनेशने गावातील नागरिकांकडून पैसे गोळा करून साठ हजार रुपये जमा केले आणि सुरगाणा येथे पहाटे चारच्या सुमारास संशयितांना दिले. पैसे खरे आहेत की नाही हे पाहण्यासाठी वाहनातील अपहरणकर्ते वाहनातून खाली उतरले. त्याचवेळी संधी साधून अपहृत प्रकाशने तेथून पळ काढला. संशयितांपैकी केशव महाले (रा. करंजाळी) यास ओळखत असल्याचा दावा प्रकाशने केला आहे.

प्रकाश गंभीर जखमी

अपहरण केल्यानंतर संशयितांनी प्रकाशला बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पैसे मिळाले नाही तर तुला मारून टाकू अशी धमकी संशयित देत होते. तसेच पोलिसांना सांगितल्यास तुझ्या घरात गांजा ठेवून गुन्ह्यात अडकवू, अशी धमकीही दिली.

संशयितांची अशीही मजल

सुरुवातीस पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, पोलीस खात्यात असलेल्या प्रकाशच्या भावाने मध्यस्थी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होत आहे असे समजताच संशयितांनी बर्डीपाडा येथील  एका जुगार मटका चालकाकडे खंडणीचे 60 हजार रुपये प्रकाशला परत देण्याचा प्रयत्न केला. पैसे परत घ्या आमची चूक झाली असे म्हणत अपहरणकर्त्यांनी गुन्हा दाखल करू नका असेही सांगितले.

पोलिसांपुढे गुंडगिरी थोपविण्याचे आव्हान

तालुक्यात गुंडगिरी फोफावली असून, पोलिसांपुढे मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. अशा गुंडावर तत्काळ कारवाई करून बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.