Fri, Jun 05, 2020 15:45
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › रुंगटा ग्रुपच्या बांधकामावर मजुराचा पडून मृत्यू 

रुंगटा ग्रुपच्या बांधकामावर मजुराचा पडून मृत्यू 

Published On: Jul 14 2019 2:24AM | Last Updated: Jul 14 2019 12:41AM
नाशिक : प्रतिनिधी

गंगापूर रोडवरील पाइपलाइन परिसरातील रुंगटा ग्रुपच्या एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.13) सकाळी घडली. बबलू बलराम मंडल (32, रा. सिरीन मेडोज, मूळ रा. पश्‍चिम बंगाल) असे या मजुराचे नाव आहे. 

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 9.30 च्या सुमारास पाइपलाइन रोडजवळ रुंगटा तिरुमला ग्रुपच्या नवीन इमारतीचे कामकाज सुरू होते. या इमारतीत  बबलू काम करीत होता. त्याला लाकडी फळी खाली नेण्याची जबाबदारी होती. पोलिसांच्या माहितीनुसार लाकडी फळी जिन्याने नेण्याऐवजी बबलूने इमारतीच्या डक्टमधून फळी खाली टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेल्याने तो पाचव्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याला तातडीने त्याचा भाऊ अभिजित कालिदास रॉय याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच बबलूचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ठेकेदार दीपक मवानी यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस तपास करीत आहेत. 

ध्रुवनगर येथे अपना घर गृहप्रकल्पात पाण्याची टाकी फुटून चार मजुरांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देखील सम्राट ग्रुपचे सुजॉय गुप्‍ता यांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्याने त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे.