Fri, Jun 05, 2020 18:34होमपेज › Nashik › पवार यांनी नाशिक दत्तक का घेतले नाही?

पवार यांनी नाशिक दत्तक का घेतले नाही?

Published On: Mar 11 2018 11:58PM | Last Updated: Mar 11 2018 10:53PMनाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जिल्ह्याने नेहमीच प्रेम केले असून, त्यांनी आजपर्यंत नाशिकला दत्तक का घेतले नाही? असा सवाल उपस्थित करत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दत्तक बाप हा भाडोत्री नसतो तर दातृत्वाच्या भावना जपतो, अशा सडेतोड शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीवर प्रति हल्लाबोल केला. सत्तेविना सैरभैर झालेले नैराश्येतून कर्जमाफीवर टीका करत असल्याचा चिमटा त्यांनी यावेळी विरोधकांना काढला. 

भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात रविवारी (दि.11) झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, पक्षाचे प्रदेश प्रवक्ता प्रा. सुहास फरांदे आदी उपस्थित होते. 

राज्यात 15 वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असताना सिंचन प्रकल्प, रस्ते विकासाची कामे रखडली होती. सिंचन नसल्याने पाणी आले नाही , वीज उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नैराश्येतून शेतकरी आत्महत्या होत असून, हे सर्व पाप मागील सरकारचे असल्याची टीका आ. फरांदे यांनी केली. राज्यातील दुष्काळासाठी सध्याचे विरोधकच जबाबदार असून, पवार यांनी दुष्काळाचा सामना का करावा लागला याची उत्तरे द्यावीत, असे आवाहन फरांदे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे काम हे पारदर्शक असून, विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते शेतकर्‍यांना हाताशी धरत विविध आंदोलने करीत आहेत. समृद्धी महामार्ग हे त्याचेच उदाहरण आहे. स्वत:च्या राजकारणासाठी विरोेधक प्रसंगी शेतकर्‍यांना आत्महत्या करायला लावत असल्याचा आरोप फरांदेंनी केला. दरम्यान, आजमितीस 23 हजार 102.19 कोटी रुपये इतकी कर्जमाफी देण्यात आली. गत तीन वर्षात जलयुक्त शिवार, विहिरींच्या कामांमुळे राज्यातील गावे जलसमृद्ध झाली आहे. केंद्राच्या मदतीने राज्यात 15 हजार किलो मीटरची कामे सुरू असल्याची माहिती फरांदे यांनी दिली.

त्यांची जागा निश्‍चित केली

डाव्या पक्षांनी काढलेल्या लॉग मार्चला पाठिंबा देण्याची वेळ राष्ट्रवादी व काँग्रेसवर यावी, ही शोकांतिका आहे. आंदोलनाला पाठिंबा द्यावा लागत असल्याने या दोन्ही पक्षांनी 50 वर्षात जनतेच्या नजरेत त्यांची काय जागा निश्‍चित केली हे समजते, अशा शब्दात आ. फरांदे यांनी टीका केली. दरम्यान, मित्रपक्ष शिवसेना देखील मोर्चाला पाठिंबा देत असल्याच्या मुद्यावर कुठे नेवून ठेवला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष अशा सवाल उपस्थित करत त्यांनी सेनेची खिल्ली उडवली. 

मुंढेंना पाठिंबा द्या

मनपा आयुक्त तुकाराम मुंढेे हे चांगले काम करत असून, त्यांना नाशिककरांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन फरांदे यांनी केले. शहरात गेल्या 17 वर्षात करवाढ झालेली नाही. मनपाचा आत्ताचा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बघता करवाढ अनिवार्य असल्याचे त्यांनी समर्थन केले. मुंबई, पुणे व ठाण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये कर हा कमी असल्याचे त्या म्हणाल्या. नाशिकमधील गावठाण विकासाचा व एसएलआरचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागविला आहे. मनपाच्या माध्यमातून लवकरच नाशिककरांना चांगली बससेवा ऊपलब्ध करून देण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिल्याची माहिती फरांदे यांनी दिली. दरम्यान, शहरातील एलईडी फिटिंगचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. गत महिन्यात झालेल्या रोजगार मेळाव्यातून 300 युवकांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.