धुळे : प्रतिनिधी
राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे 167 टीएमसी पाणी समुद्रात वाहून जात आहे. हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात आणण्याचे काम आगामी काळात केले जाणार आहे. या भागांमध्ये मेगा रिचार्ज करून सिंचन क्षेत्र वाढवणार आहे. त्यामुळे भविष्यात खानदेशात कधीही दुष्काळ पडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाजनादेश यात्रेचे दोंडाईचा शहरात आगमन झाल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्षा नयकुवर रावल, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, पं. स. सदस्या संजिवनी सिसोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सत्तेत असतानाही यात्रा का काढतात, असा सवाल अनेक लोक करतात. पण भाजपाविरोधात असताना संघर्ष यात्रा काढते. पण सत्तेत आल्यानंतर जनतेसमवेत संवाद करण्यासाठी यात्रा काढते. आमच्या सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीचे काम आम्ही करतो आहोत. गेल्या पाच वर्षांत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. या काळात आलेल्या आव्हानांना सकारात्मकपणे सामोरे गेलो. आज महाराष्ट्र हे देशात एक नंबर करण्यासाठी काम केले आहे. रोजगार आणि उद्योग क्षेत्रात देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. शिक्षण क्षेत्रात पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र 18 व्या क्रमांकावर होता. आज तिसर्या क्रमांकावर आहे. पुढील वर्षी या क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल. इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात नीती आयोगानेच राज्य अग्रेसर असल्याचे सांगितले आहे. बोंडअळी तसेच दुष्काळात व अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकर्यांना मदत केली. त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. सुळवाडे जामफळ धरणाचे काम झाल्यास धुळे जिल्ह्याचे चित्र बदलू शकते. पण आतापर्यंत धुळेकरांना केवळ या प्रकल्पाच्या नावाखाली स्वप्ने दाखवली जात होती. स्वप्नांच्या पलीकडे काही केले जात नसल्याने या भागात सिंचन प्रकल्प रखडले होते. पण भाजपाच्या खा. सुभाष भामरे, मंत्री जयकुमार रावल व मंत्री गिरीश महाजन यांनी पाठपुरावा केला. या सर्वांसमवेत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी निधी दिला आहे. त्यामुळे आता धुळे जिल्हा सुजलाम् सुफलाम् करणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्रीपदाचे काम हाती घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी सर्व प्रकल्प मार्गी लावण्याचे काम केले आहे. येत्या पाच वर्षांत हे राज्य दुष्काळमुक्त करण्याचे काम केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
या राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी समुद्रात जाते. पण आता हे पाणी उचलून उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात आणून सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 2021-2022 पर्यंत राज्यात शहर व गावात प्रत्येकाला घरे दिली जाणार आहेत. या राज्यात कुणीही बेघर राहणार नाही. या कामाची सुरुवात केली आहे. इंदूर-मनमाड रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागले असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हायवेचे मोठे काम झाले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात 18 हजार गावांत पाणी योजना केल्या आहेत. राज्यातील सर्व समस्या सुटल्या आहेत, असा आमचा दावा नाही. राज्यात अजूनही अनेकसमस्या आहेत. पण गेल्या 15 वर्षांत विरोधकांना जे जमले नाही तेच काम भाजपा युतीने पाच वर्षांत करून दाखवले आहे, असेही त्यांनी सांगितले.