Tue, May 26, 2020 12:40होमपेज › Nashik › पश्‍चिममध्ये भाजपाची डोकेदुखी

पश्‍चिममध्ये भाजपाची डोकेदुखी

Last Updated: Oct 15 2019 12:02AM
नाशिक : प्रतिनिधी

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघामधील युतीचा वाद इतका विकोपाला गेला आहे की, भाजपा उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक दौर्‍यावर आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्या शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास शिंदे यांच्याविषयी गार्‍हाणे मांडण्यासाठी गेल्या. परंतु, ठाकरे यांनी हिरे यांच्याकडे कानाडोळा केल्याने भाजपा-शिवसेना पुरस्कृत उमेदवार हिरे यांची डोकेदुखी वाढणार आहे.  

पश्‍चिम मतदारसंघावर शिवसेना नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी खरे तर आधीपासूनच हक्‍क सांगितला होता. यामुळे सुरुवातीपासूनच्या या मागणीवर शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास शिंदे हे आजही कायम असल्याने भाजपा उमेदवार सीमा हिरे यांच्यासमोरील आव्हाने अधिक वाढली आहेत. दोन्ही उमेदवारांचे वास्तव्य एकाच भागातील असल्याने संबंधित भागातील मतदारांचीही द्विधास्थिती होणार आहे. यामुळे ते कुणाला कौल देतात यावर या दोन्ही उमेदवारांचे आणि या दुभागणार्‍या मतांचा फायदा प्रतिस्पर्धी तिर्‍हाईत उमेदवारांना होण्याची जास्त शक्यता आहे. पश्‍चिम मतदारसंघात महापालिकेच्या सिडको आणि सातपूर या दोन विभागांचा समावेश होतो. या दोन्ही विभागांतील शिवसेनेच्या 22 नगरसेवकांनी बंड पुकारत शिवसेनेच्या बाजूने गड लढविण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय अखेरपर्यंत राहिल्याने भाजपासमोरील बंड काही कमी झालेले नाही. हिरे यांनी शिंदे यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी नाना तर्‍हा केल्या. मात्र, त्यात त्यांना यश काही आलेले नाही. दोन दिवसांपूर्वी दिंडोरी, नांदगाव व येवला येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकला आले होते. त्यावेळी ते उतरलेल्या हॉटेलच्या ठिकाणी भाजपा उमेदवार सीमा हिरे त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांसह गेल्या. शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास शिंदे यांची अडचण दूर व्हावी आणि त्याविषयी काही निर्णय व्हावा या हेतूने हिरे या ठाकरेंंच्या भेटीस गेल्या होत्या. मात्र, त्या ठिकाणी ठाकरे यांनी भेट नाकारत बोलणेही पसंत केेले नाही. तसेच स्वत:बरोबर छायाचित्र घेण्यासही त्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे. 

हवा ‘त्या’ 22 नगरसेवकांची 

मध्यंतरी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्या 22 नगरसेवकांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवकांनी त्यांनाही दाद दिली नाही. यामुळे सध्या तरी पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या 22 नगरसेवकांचीच हवा अन् चर्चा आहे हे मात्र नक्‍की. विशेष म्हणजे हे 22 नगरसेवक सुरुवातीपासून एकत्र आहेत. यातील अनेकांची मने या ना त्या बहाण्याने  जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही अद्याप उपयोग झालेला नाही. 

पश्‍चिममधील प्रश्‍न ‘जैसे थे’

पश्‍चिम मतदारसंघातील अनेक प्रश्‍न वर्षानुवर्षे रेंगाळत पडलेले असल्याने यावेळी मतदार कुणाला कौल देतात याकडे लक्ष लागून आहे. एमआयडीसीतील बेरोजगारी, सुविधा, बसस्थानके, सिडकोतील फ्री होल्ड, भूमिगत वीजतारा असे अनेक प्रश्‍न आजही ‘जैसे थे’च आहेत.