Fri, Nov 27, 2020 21:52होमपेज › Nashik › वागदर्डी पाणलोट क्षेत्रावर पाऊस रुसला

वागदर्डी पाणलोट क्षेत्रावर पाऊस रुसला

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 10:56PMमनमाड : वार्ताहर

एकीकडे रविवारी मुसळधार पावसाने मनमाड शहर परिसराला तासभर झोडपून काढले असले तरी दुसरीकडे मात्र शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस झाला नाही. पावसाअभावी धरणाने तळ गाठला असून, सध्या धरणात फक्‍त मृतसाठाच शिल्लक असल्यामुळे भर पावसाळ्यात सव्वा लाख नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लवकरच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग आणि जोरदार पाऊस झाला नाही तर एक हंडा पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगावनंतर मनमाड एकमेव मोठे शहर मानले जाते. रेल्वेचे मोठे जंक्शन स्टेशन, ब्रिटिशकालीन ऐतहासिक रेल्वे वर्कशॉप, अन्‍न-धान्य साठवणूक करणारा भारतीय अन्‍न महामंडळाचा आशिया खंडात क्रमांक दोनचा मानला जाणारा डेपो, विविध ऑइल कंपन्यांचे इंधन प्रकल्प यामुळे मनमाडची राज्यात नव्हे, तर देशात एक आगळीवेगळी ओळख निर्माण झालेली आहे. या ओळखीबरोबरच पाणीटंचाईचे माहेरघर म्हणूनदेखील या शहराला ओळखले जाते. बारा महिने येथील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.

दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना वाटते यावर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होऊन धरण भरेल व आपली पाणीटंचाईतून सुटका होईल. मात्र, तसे काही घडत नाही. यावर्षीदेखील पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटलेला असताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. रविवारी तर शहर परिसरात तब्बल एक तासापेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाला. मात्र, वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. वागदर्डी धरण चांदवड तालुक्यात असून, त्या भागात पाऊस झाला तर धरणात पाणी येते. चांदवड तालुक्यातही दमदार पाऊस झाला नसल्यामुळे धरणात पाणी आले नाही. पावसाअभावी धरणाने तळ गाठला असून, सध्या धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक आहे. त्यातूनच पालिकेतर्फे 12 ते 15 दिवसांआड म्हणजेच महिन्यातून दोन किंवा तीन वेळा पाणीपुरवठा केला जात असल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.