Fri, Jul 10, 2020 09:06होमपेज › Nashik › पाण्यात गढूळपणा वाढला; आजारांना निमंत्रण

पाण्यात गढूळपणा वाढला; आजारांना निमंत्रण

Published On: Jul 10 2019 1:42AM | Last Updated: Jul 09 2019 10:50PM
नाशिक : प्रतिनिधी

पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर करण्यात येणारी पाणी नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून, प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार पाण्यातील गढूळपणा वाढला असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे पाण्याची पातळी वाढल्याने मात्र अन्य रासायनिक घटकांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व गुणवत्ता कक्षाने दिली.

जिल्ह्यात सात हजारांवर पाण्याचे स्रोत असून, येथूनच संबंधित गावांना पाण्याचा पुरवठा होत असतो. हे पाणी पिण्यास योग्य की अयोग्य याची तपासणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर केली जाते. पावसाळ्यात 6,088 तर पावसाळ्यापूर्वी 7,393 पाणी  नमुने तपासण्यात आले.

पावसाळ्यापूर्वी तपासलेल्या नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण 12.98 टक्के होते. पावसाळ्यात मात्र हे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होऊन 10.81 टक्क्यावर आले. फ्लुराइडचे प्रमाण 0.07 टक्के आढळून आले आहे. पावसाळ्यापूर्वी तपासलेल्या नमुन्यांमध्ये हेच प्रमाण 0.16 टक्के होते. फ्लुराइडयुक्त पाण्याच्या सेवनाने डेंटल फ्लोरोसिस नावाचा आजार होतो. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावलेली असल्यानेच त्यावेळी फ्लुराइडचे प्रमाण अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी केलेल्या तपासणीत लोहाचे प्रमाण 0.72 टक्के होते. आताच्या तपासणीत मात्र हेच प्रमाण 0.67 टक्के आहे. या पाण्यामुळे कपड्यांवर लाल डाग पडतात. पाणी कमी प्रमाणात प्यायले जात असल्याने पोटदुखीही उद्भवते. क्षारयुक्त पाणी 0.87 टक्के इतके आहे. पावसाळ्यापूर्वी हेच प्रमाण 0.51 टक्के होते. म्हणजे क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण सध्या वाढलेले आहे. बेचव लागत असल्याने हे पाणी प्यायले जात नाही. 

आम्लयुक्त पाणी 0.16 टक्के आढळून आले आहे. पावसाळ्यापूर्वी हे प्रमाण 0.65 टक्के एवढे होते. म्हणजे आम्लयुक्त पाण्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. या पाण्याच्या सेवनाने अपचनाचा त्रास होत असून, जेवणही कमी होत असते. 

पाण्याचा गढूळपणा मात्र वाढलेला आहे. पावसाळ्यापूर्वी हे प्रमाण 0.20 टक्के होते. आता मात्र ते एक टक्क्यांवर पोहोचले आहे. पावसाळ्यापूर्वी क्लोराइडयुक्त पाणी 0.20 टक्के असले तरी सध्या मात्र एकही नमुना आढळलेला नाही. पाण्याचा कठीणपणा मात्र वाढलेला आहे. एकूण 305 नमुने सध्या आहेत. पावसाळ्यापूर्वी 221 नमुने होते.