Tue, Jun 02, 2020 14:45होमपेज › Nashik › उद्योगजगताला ‘कुशल’तेची प्रतीक्षा

उद्योगजगताला ‘कुशल’तेची प्रतीक्षा

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: May 01 2018 12:30AMनाशिक : गौरव जोशी

लाखो बेरोजगारांच्या हाताला काम देणार्‍या उद्योग जगतात कुशल मनुष्यबळाची कमी भरून काढण्यासाठी कुशल मनुष्यबळ विकास निर्मितीवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांंतर्गत तरुणाईला प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, यानंतरही नाशिकमधील उद्योगांच्या नवसंजीवनीसाठी कुशल कामगारांची प्रतीक्षा कायम आहे. 

नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रासह खासगी व सहकारी उद्योगांचे जाळे पसरले आहेत. जिल्ह्यात 20 हजार नोंदणीकृत उद्योग आहेत. जवळपास दोन लाख कामगारांची रोजीरोटी या उद्योगांवर सुरू आहे. मात्र, असे असले तरी प्रत्यक्षात नाशिकच्या उद्योग क्षेत्राला गेल्या दहा वर्षांपासून अवकळा आली आहे. त्याला जिल्ह्यात एकाही मोठ्या उद्योगाची पायाभरणी झालेली नाही, हे एक आणि कुशल कामगारांची नेहमीच भासणारी उणीव हे दुसरे प्रमुख कारण आहे. 

जिल्ह्यात अंबड-सातपूरसह दिंडोरी, सिन्‍नर, घोटी-इगतपुरी, मालेगाव, पेठ आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये चार हजार 200 भूखंड आहेत. याशिवाय खासगी व सहकारी तत्त्वावरील उद्योग वाढीस लागले आहेत. परंतु, औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचा विचार केल्यास आजमितीस सुमारे 2500 उद्योग सुरू आहेत.

गेल्या दहा वर्षांत मालक-कामगार संघटना यांच्यातील वाद, वाढती स्पर्धा आणि अकुशल कामगारांमुळे उत्पन्नातील घट या प्रमुख गोष्टींमुळे बहुतांश उद्योगांना कायमचे टाळे लागले आहे. नाशिकमध्ये गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारचा कौशल्य विकास उपक्रम राबविला जात आहे. रोजगार मेळाव्यांमधून युवकांची निवड करून त्यांना प्रशिक्षणासह रोजगार दिला जातोय. उद्योगांची गरज व कुशल कामगारांची संख्या यातील दरी ज्या दिवशी कमी होईल, त्यावेळेस खर्‍या अर्थाने नाशिकच्या उद्योगांना बळकटी मिळेल. 

नववसाहतींवर भर

नाशिकमध्ये अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींची क्षमता संपुष्टात आली आहे. दिंडोरी, सिन्‍नर व इगतपुरी-घोटीची परिस्थिती निराळी नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला उभारी द्यायची झाल्यास नव्याने औद्योगिक वसाहती निर्माण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने एमआयडीसी प्रशासन कामाला लागले आहे. आक्राळे, सिन्‍नर, मालेगावसह दिंडोरीत सध्या उद्योगांसाठी नवीन प्लॉट उपलब्ध करून देण्यावर कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी नवीन वसाहती उभारण्यावर प्रशासन काम करते आहे. 

लघुउद्योग रोजगाराचे केंद्र 

जिल्ह्यात मोठे-मध्यम-लघु असे मिळून 20 हजार उद्योग आहेत. लघुउद्योग 18 हजार 961 आहे. मोठे 191 असून, मध्यम उद्योगांची संख्या 66 इतकी आहे. गेल्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योग जिल्ह्यात आलेला नाही. लघुउद्योगांमधून दीड लाख रोजगार निर्मिती झाली आहे. तर मध्यम उद्योगांतून सहा हजार 430 तसेच मोठ्या उद्योगांद्वारे 46 हजार 41 कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. या तिन्ही घटकांचा विचार केल्यास जिल्ह्यातील लघुउद्योग हे रोजगार निर्मितीचे केंद्र ठरले आहे.