Thu, Aug 13, 2020 17:52होमपेज › Nashik › रब्बी पिके वाचविण्यासाठी कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा

रब्बी पिके वाचविण्यासाठी कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा

Published On: Dec 18 2017 2:39AM | Last Updated: Dec 17 2017 11:04PM

बुकमार्क करा

पिंपरखेड : वार्ताहर

ओखी वादळानंतर जिल्ह्यात सर्वत्रच रब्बीच्या पिकांना तडाखा बसला आहे. वादळानंतर विषम हवामानामुळे करपा, बुरशीजन्य रोगास रब्बी पिके बळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिके जगवण्यासाठी धडपड करीत महागड्या औषधांसाठी वाटेल ती किंमत मोजून पिकांवर औषधी फवारणी करत आहेत. रब्बीच्या चांगल्या हंगामासाठी अजूनही  काळवंडलेले आभाळ  शेतकर्‍यांचा पिच्छा सोडत नसल्याने शेतकरी कडाक्याच्या थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. 

यंदा थंडीने बराच उशीर केला. ऐन दिवाळीत पावसाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर थंडीला सुरुवात होते न होते तोच ओखी वादळाचा प्रभाव जिल्ह्यातील वातावरणात दिसून आला. अजूनही काळवंडलेले आभाळ असल्याने कडाक्याची थंडी पडत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत. एरवी दुष्काळी परिस्थितीत पावसाची चातकप्रमाणे वाट बघणारा शेतकरी रोगमुक्त व चांगल्या रब्बीतील उत्पन्नासाठी कडाक्याच्या थंडीची वाट पाहत आहे.

रब्बी पीक वाढीसाठी किमान 10 ते 15 डिग्री अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते. विषम हवामानाचा पिकावर परिणाम होत आहे. थंडी नसल्याने गहू पिकाची फुटव्याची व ओंबीतील दाण्याची संख्या कमी होऊन उत्पादनात घट होईल. हरभरा पिकावर थंडी नसल्याने घाटअळीचा प्रादुर्भाव होईल. तालुक्यातील मुख्य पीक कांदा यावर करपा, मावा पडून नुकसान होईल. त्यासाठी महागडे औषध फवारूनही उत्पन्न निघेल, याची खात्री नाही. त्यामुळे कडाक्याची थंडी पडणे आवश्यक असल्याचे मत परधाडी येथील शेतकरी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले.