Wed, Jun 03, 2020 22:38होमपेज › Nashik › पालखेड, गिरणा खोर्‍याला दमदार पावसाची प्रतीक्षा

पालखेड, गिरणा खोर्‍याला दमदार पावसाची प्रतीक्षा

Published On: Jul 14 2019 2:24AM | Last Updated: Jul 14 2019 12:31AM
नाशिक : प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु, कसमादे पट्ट्यावर पावसाने म्हणावी तशी आभाळमाया केलेली नाही. त्यामुळे पालखेड व गिरणा खोर्‍यातील धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूरमधील साठा 51 टक्के झाला असून, जिल्ह्यातील प्रमुख 24 प्रकल्पांमधील साठा 15 हजार 489 दलघफूवर पोहोचला आहे.

मान्सूनने यंदा जिल्ह्यात उशिराने एन्ट्री केली. गेल्या आठवड्यात नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ आदी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे गंगापूर व दारणा समूहातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. नाशिककरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गंगापूरचा साठा 2,876 दलघफूवर (51 टक्के) पोहोचला आहे. समूहातील चारही धरणे मिळून एकूण साठा 4 हजार 332 दलघफू म्हणजेच 42 टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे धरण असलेल्या दारणात 4,839 दलघफू (68 टक्के) पाणी आहे. 

दारणा समूहातील सहा प्रकल्पांतील साठा 9 हजार 22 दलघफूवर पोहोचला असून, त्याची टक्केवारी 48 आहे. दमदार पावसामुळे नाशिक, त्र्यंबकेश्‍वर आणि इगतपुरीतील धरणे भरत असताना जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मात्र म्हणावा तेवढा पाऊस झालेला नाही. कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड आणि बागलाणमध्ये सरासरीच्या 30 टक्केही पाऊस पडलेला नाही. पालखेड समूहात अवघे 638 दलघफू म्हणजेच 8 टक्के तर गिरणा खोर्‍यात 1,385 दलघफू (6 टक्के) साठा आहे. 

जिल्ह्यातील 24 प्रमुख प्रकल्पात केवळ 24 टक्के पाणी आहे. गंगापूर व दारणा लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्याची आकडेवारी 24 टक्क्यांवर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांमध्ये या खोर्‍यांमध्ये चांगला पाऊस न झाल्यास पालखेड व गिरणा खोर्‍यातील धरणे अक्षरश: कोरडीठाक पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.