Tue, Jun 02, 2020 13:38होमपेज › Nashik › व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसाठी उद्या मतदान

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसाठी उद्या मतदान

Published On: Jul 19 2019 2:17AM | Last Updated: Jul 19 2019 12:42AM
नाशिक : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.20) मतदान होत आहे. निवडणूक मंडळाकडून तयारी पूर्ण झाली असून, 39 बूथवर 351 कर्मचारी काम करणार असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी दिली. दरम्यान,  सत्ताधारी प्रगती आणि क्रांतिवीर पॅनलसह 9 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
ज्येष्ठ विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्य अशा एकूण 29 जागांसाठी कॅनडा कॉर्नरवरील नाशिक मुख्यालयात मतदान होणार असून, रविवारी (दि.21) गंगापूर रोडवरील चोपडा हॉल येथे मतमोजणी होणार आहे. संस्थेचे 8,608 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी 39 बूथवर 351 कर्मचारी काम करणार आहेत. तर त्यांना 15 मदतनीस राहणार आहेत.

मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे. मतदारांना अध्यक्ष 1 मत, उपाध्यक्ष 1, सरचिटणीस 1, सहचिटणीस 1, विश्वस्त गटासाठी 6 मते, नाशिक गटात 4 मते, सिन्नर गटात 3 मते, निफाड -चांदवड गटात 3 मते, येवला-मालेगाव गटात 2 मते, नांदगाव, बागलाण व कळवण गटात 2 मते, स्त्री राखीव गटात 2 मते अशी एकूण 29 मते देण्याचा अधिकार आहे. मतदानाला येताना शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन निवडणूक मंडळातर्फे करण्यात आले आहे. निवडणूक मंडळात अ‍ॅड. अशोक कातकाडे, अ‍ॅड. संतोष दरगोडे यांचा समावेश असून, लवाद म्हणून अ‍ॅड. एस. जी. सोनवणे काम बघत आहे.

सीसीटीव्हीसह पोलीस बंदोबस्त 

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता संपूर्ण मतदान प्रक्रिया ही सीसीटीव्हीत कैद होणार आहेत. तसेच मतदान आणि मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची  माहिती  अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.