Fri, Jun 05, 2020 04:56होमपेज › Nashik › विजय शिवसेनेचा; चर्चा मात्र भुजबळांची!

विजय शिवसेनेचा; चर्चा मात्र भुजबळांची!

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:36PMनाशिक : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात नेहमीच लक्षवेधी व्यक्तिमत्त्व ठरलेले माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निमित्ताने होऊ लागली आहे. शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांचा विजय झाला असला तरी भुजबळांभोवती संशयाचे धुके दाटले आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विस्तार करण्याच्या नादात भुजबळ देशाबाहेर पोहोचले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेल्या भुजबळ यांनी राष्ट्रवादीत क्रमांक दोनचे नेते म्हणून स्थान मिळविले. नाशिक जिल्ह्याचे पालकत्व 15 वर्षांहून अधिक काळ निभावताना त्यांनी त्या काळात जणू एकछत्री अंमलच केला. त्यामुळेच विरोधकही त्यांनी दावणीला बांधले. भुजबळांचा जिल्ह्यावर असलेला प्रभाव ते अडीच वर्षे तुरुंगात असतानाही दिसून आला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा मुद्दा असो की पक्षीय कामकाज, त्यांना विचारात घेऊनच निर्णय घेतले गेले. एवढेच नाही तर, राजकीय वैर असलेल्या हिरे कुटुंबीयांनीही अलीकडच्या काळात भुजबळांशी गाठीभेटी सुरू करून जुळून घेतले. या सार्‍या घडामोडी पाहता विधान परिषदेच्या निवडणुकीत भुजबळांच्या नावाची चर्चा होणे स्वाभाविकच ठरून गेले. 

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जामिनावर सुटलेले भुजबळ राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना निवडून आणतील, अशी अटकळ बांधली गेली होती. ज्याप्रमाणे जयवंत जाधव यांच्यासाठी ताकद पणाला लावली होती, तशीच ती यावेळीही लावतील, असेही बोलले जात होते. म्हणजे, सहाणे विजयी झाले असते तर त्याचे श्रेय निश्‍चितच भुजबळांना गेले असते. पण, आता हेच सहाणे पराभूत झाल्याने भुजबळ यांच्याकडेच संशयी नजरेने पाहिले जात आहे.

त्याला गेल्यावेळच्या निवडणुकीचा इतिहास कारणीभूत धरण्यात आला. एक म्हणजे, जाधव यांना निवडून आणण्यासाठी याच सहाणे यांनी भुजबळ यांच्या तोंडाला फेस आणला होता. दुसरे म्हणजे सहाणे यांच्या न्यायालयीन लढाईमुळेच जाधव यांना तीन वर्षांचा आमदार निधी मिळू शकला नाही. असे असेल तरी सहाणे यांना निवडून आणण्यासाठी भुजबळ खरोखरच प्रयत्न करतील काय, हाच खरा प्रश्‍न होता. बरे, ज्यांच्यामुळे उपमुख्यमंत्रिपद सोडावे लागले, त्या अजित पवार यांनीच सहाणे यांना निवडून आणण्यासाठी सारी ताकद पणाला लावली, त्याच पवार यांची ताकद वाढविण्यासाठी सहाणे यांच्या विजयाला भुजबळ खरोखरच हातभार लावतील का, याविषयी शंका होती. या सार्‍या शंका कुशंका राजकारणात व्यक्‍त केल्या जात असताना भुजबळ प्रत्यक्ष निवडणुकीत सक्रिय झालेच नाही. कोणाच्या विजयाचे वा पराभवाचे श्रेय त्यांना देण्यात काहीच अर्थ नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.