Tue, Jun 02, 2020 14:19होमपेज › Nashik › ८४१ बसगाड्यांवर बसविली व्हीटीएस प्रणाली

८४१ बसगाड्यांवर बसविली व्हीटीएस प्रणाली

Published On: Aug 02 2019 1:18AM | Last Updated: Aug 01 2019 11:32PM
नाशिक : नितिन रणशूर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिक विभागात राबविण्यात येत असलेला व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस) पथदर्शी प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. विभागातील 850 बसगाड्यांमध्ये व्हीटीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. तर शहरासह ग्रामीण भागातील साडेतीन हजार मार्गांचे मॅपिंग झाले आहे. त्यामुळे येत्या आठवडेभरात व्हीटीएस प्रणालीचे लोर्कापण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

प्रवाशांची सुरक्षितता व सुविधांच्या दृष्टीकोनातून एसटी महामंडळ सातत्याने कात टाकत असते. बसस्थानकांवर येणार्‍या तसेच सुटणार्‍या बसेसची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध होण्यासाठी व्हीटीएस प्रणाली राबविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या प्रणालीने प्रवाशांना बसचे थेट लोकेशन कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. 

जिल्ह्यातील 13 आगारामधील 841  व्हेइकल टॅ्रकिंग सिस्टिम बसविण्यात आली आहे. या बसेसमध्ये लालपरीपासून शिवशाहीपर्यंत सर्व गाड्यांचा समावेश आहे. लालपरी 58, निमआराम- 15, परिवर्तन- 678, शिवशाही-90 बसमध्ये व्हीटीएस बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. 90 शिवशाहीमध्ये खासगी 41 तर महामंडळाच्या 49 गाड्यांचा समावेश आहे. परिवर्तन बसमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे महामंडळाने परिवर्तनकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे. 

बसच्या लोकेशनची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील 13 बसस्थानकांच्या परिसरात मोठ्या आकाराची स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या धर्तीवर प्रवाशांना बसची माहिती स्क्रीनवर सहज मिळणार आहे. तर नाशिक विभागातील सुमारे साडेतीन हजार मार्गाच्या मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात मोबाइल कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये खोळंबा होत असल्याने व्हीटीएस कार्यन्वित होण्यास विलंब होत आहे.

व्हीटीएस प्रणालीच्या बसगाड्यांची माहिती मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सध्या प्रायोगिकत्वावर प्रणालीचा वापर केला जात असून त्रुटी आढळून आल्यास त्या दूर केल्या जात आहे. मोबाइल अ‍ॅपचेही काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, नुकतेच औरंगाबाद दौर्‍यावर येऊन गेलेल्या एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी ऑगस्टमध्ये व्हीटीएस प्रणाली कार्यान्वित करण्याचे संकेत दिले आहे.