Sat, Oct 24, 2020 09:28होमपेज › Nashik › मुख्यमंत्र्यांनी सरकारचा सातबारा कोरा केला

मुख्यमंत्र्यांनी सरकारचा सातबारा कोरा केला

Last Updated: Oct 19 2020 12:44AM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरात सरकारचा सातबारा कोरा केल्याची घणाघाती टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. मंदिरे खुली करण्यावरून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकल्याचा आरोप त्यांनी केला. 

रविवारी (दि.18) नाशिकच्या दौर्‍यावर आलेल्या ना. आठवले यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, कोरोना संकटात राज्यांना मदत करण्याची केंद्राची भूमिका आहे. परंतु, दुर्दैवाने राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात कमी पडले असून, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंर्त्यांनी कोरोना आकडेवारीत देशात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकार अडचणीत असल्याच्या वक्‍तव्याचा समाचार घेताना बाधितांना तत्काळ मदतीची मागणी आठवलेंनी केली. खा. शरद पवार हे नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत असून, मुख्यमंत्री उद्यापासून घराबाहेर पडणार आहेत. त्यामुळे खा. पवारांच्या अनुभवाचा वापर करून घेत सरकारने शेतकर्‍यांना भरघोस मदत करावी. तसेच भरपाईसाठी पंतप्रधान व वित्तमंर्त्यांकडे स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  हाथरस घटनेत पीडितेच्या कुटुंबांची भेट घेण्यावरून खा. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना दलितांवरील अत्याचाराबाबत आजपर्यंत एक शब्द न काढणार्‍यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत खा. राऊत यांच्यावर निशाणा साधला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी आठवलेंनी केली. चीनच्या मदतीने जम्मू- काश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा लागू करण्याची भाषा करणार्‍या फारूख अब्दुला यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आठवले यांनी केली.

तर आयोजकांवर कारवाई  : शिवसेनेने शिवाजी पार्कवर 100 व्यक्‍तींच्या उपस्थितीत दसरा मेळावा घ्यावा. तसेच प्रसारमाध्यमातून प्रसारण करावे, असा सल्‍ला आठवलेंनी दिला. त्यानंतरही सेनेने गर्दी जमविल्यास कायदा-सुव्यवस्था मोडल्या प्रकरणी थेट आयोजक म्हणून मुख्यमंर्त्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा द्यायला ते विसरले नाहीत.

कार्यकर्ते शूटिंग बंद पाडतील : मुंबईतून बॉलिवुड हलविण्यास आमचा विरोध आहे. ड्रग्जचे सेवन करणार्‍या कलाकारांना बॉलिवुडने कोणतेही काम देऊ नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते शूटिंग बंद पाडतील, असा इशारा आठवलेंनी दिला. कंगना राणावतने मुंबईबद्दल केलेल्या विधानाचे समर्थन होऊ शकत नाही. परंतु, महिला म्हणून आम्ही तिला पाठिंबा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांवरील अत्याचाराचे समर्थन केले नसते, असे सांगत बॉलिवुडमधील महिला अत्याचार थांबले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी  मांडली. 

शिष्यवृत्तीच्या पैशांचे लवकरच वाटप : केंद्र सरकारकडून एसी व एसटी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीचे 60 कोटी रुपये राज्य सरकारच्या बँक खात्यात पडून असल्याबाबत ना. आठवलेंचे लक्ष वेधले. त्यावर अधिकार्‍यांना लवकर हे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. तसेच दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना लवकर पैसे मिळू शकतील, यावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 "