Thu, Nov 14, 2019 16:20होमपेज › Nashik › धुळ्याच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार, उपमहापौरपदी अंपळकर बिनविरोध

धुळ्याच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार, उपमहापौरपदी अंपळकर बिनविरोध

Published On: Dec 31 2018 1:37PM | Last Updated: Dec 31 2018 1:25PM
धुळे:  प्रतिनिधी 

धुळ्याच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार तर उपमहापौरपदी कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नियोजित वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले.

सोमवारी सकाळी ११ वाजेता महापालिकेच्या सभागृहात ही सभा झाली. यात सर्वप्रथम महापौरपदाच्या निवडीसाठी कार्यवाही करण्यात आली. सध्या महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे ५० नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी आघाडीचे २४ नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने राष्ट्रवादी आघाडीच्या मंगल चौधरी यांनी माघार घेतल्याने चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडीत सद्दीन खान यांनी माघार घेतल्याने कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली. 

त्यानंतर महापौर सोनार आणि उपमहापौर अंपळकर यांचा सत्कार भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, सरचिटणीस हिरामण गवळी आदींनी केला. यावेळी बोलताना सोनार यांनी आम्ही शहराचे सेवक आहोत. त्यामुळे २४ तास सर्व नगरसेवक जनतेची सेवा करतील. शहरात स्वच्छता अभियान राबवून धुळमुक्त शहर करणार आहे. या पालिकेत मी बिगारी पदावर काम केले आहे. आज त्यांनी महापालिकेत मला महापौर पदाची संधी दिली. मी या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पक्षाच्या नेत्याच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

त्यानंतर बोलताना अनुप आग्रवाल यांनी, निवडणूक काळात भाजपने १५ सूत्री कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार हा विकासाचा अजेंडा राबविण्यात येईल. या शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ता असली तरीही विरोधी नगरसेवकांच्या प्रभागात देखील विकास काम होतील. विकासात भेदभाव होणार नाही असे त्यांनी सांगितले.