Fri, Jun 05, 2020 04:45होमपेज › Nashik › भ्रष्टाचाराची लाज वाटली नाही? : उद्धव ठाकरे 

भ्रष्टाचाराची लाज वाटली नाही? : उद्धव ठाकरे 

Published On: Apr 25 2019 1:45AM | Last Updated: Apr 24 2019 11:29PM
नाशिक : प्रतिनिधी

आघाडी सरकारने 60 वर्षे भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली. तुम्ही आम्हाला लाज वाटते का विचारता, लाज काय असते तुम्हाला माहीत आहे का, असा जाब विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या बकासुरांना हद्दपार करण्याचे आवाहन केले. नाशिक लोकसभा मतदार संघातील भाजपा-सेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, युतीचे उमेदवार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते. विरोधकांची आघाडी नेतृत्वहीन आहे, असे म्हणत त्यांनी आघाडीला मदत करू पाहणारे राज ठाकरे यांचाही समाचार घेतला. स्वतः बुडालेले, सत्यानाश करून घेतलेले आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घेऊन बुडणार असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली. विरोधकांना केवळ हिंदुत्ववादी सरकार नको आहे. मुलांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने घोटाळे केले. आदर्श घोटाळा, शेण, कोळसा घोटाळा, बोफोर्स घोटाळा, बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा, आतंकवादी हल्ल्यांना साथ देणारे आम्हाला जाब विचारत आहे. आम्हाला जाब विचारण्यापेक्षा इतके घोटाळे करूनही तुम्हाला लाज नाही वाटत का असा प्रश्‍न ठाकरे यांनी उपस्थित केला. शरद पवारही काँग्रेसच्या रांगेत जाऊन बसले आहे.  जवानांची हिंमत वाढविण्याऐवजी ते त्यांचे खच्चीकरण करीत आहेत. सोनिया गांधी यांना विदेशी बाहुली आणि राहुल यांच्या वडिलांना पोरटोर म्हणून हिणवणारे आणि काँग्रेसमधून बाहेर पडणारे आज पुन्हा काँग्रेसच्या गळ्यात गळा घालत असल्याची टिकाही त्यांनी पवार यांच्यावर केली. 

इशरत जहाँच्या घरी राष्ट्रवादीचे शरद पवार गेले. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या घरी कधी गेले का. आमची युती देव, देश आणि धर्मासाठी आहे. तुमची आघाडी कशासाठी आहे. कन्हैया कुमारसारखा देशद्रोही निवडणूक लढवतो ते यांना चालते.  औरंगजेबच्या थडग्यावर डोके टेकविणार्‍या औवेसीच्या नादी लागू नका, असे आवाहन त्यांनी दलित, मुस्लिम बांधवांना केले. आघाडीत आज कोण नेता आहे. मायावती, अखिलेश यादव यांना काँग्रेस नकोय. मग पंतप्रधान म्हणून पुन्हा देवेगौडा बसविणार का ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. यावेळी हेमंत गोडसे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती सादर केली. 

अतिरेकी तुमचे नातेवाईक का? 

बालाकोटमध्ये झालेल्या हल्ल्याविषयी जवानांचे कौतुक करायचे सोडून हल्ला खरच झाला का, अतिरेकी इतकेच मारले गेले का अशी विचारणा करून विरोधक जवानांचे खच्चीकरण करत होते. देशावर हल्ला करणारे अतिरेकी, दहशतवादी तुमचे नातेवाईका आहेत का असा सवाल ठाकरे यांनी विरोधकांना विचारला. आज देशाभोवती हिरवा फास आवळला जातोय. पश्‍चिम बंगालमध्ये प्रचारासाठी बांगलादेशातून फिरदोस अहमद या अभिनेत्याला आणले जाते. का तर तेथील बांगलादेशी मते मिळविण्यासाठी. तिकडे फारूक अब्दुला, मुप्‍ती मेहबुबा देशाविरोधी फुत्कार ओकत आहे. अशा गोष्टींना हद्दपार करण्यासाठी भगव्याला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. 

एकजूट दाखवा : महाजन

मालेगावमधील पाच लाख मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत भाजपा-सेनेला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धुळ्याचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे काहीसे धास्तावले आहेत. परंतु, चिंता करण्याचे काम नाही. ते पाच लाख आहेत तर आपण 15 लाख आहोत. त्यामुळे येत्या मतदानाच्या दिवशी आपणही आपली एकजूट दाखवून द्या, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. ही निवडणूक देशाची असून, एकीकडे देशातील 56 पक्ष एकत्रित आले असताना तेे पंतप्रधानपदाचा उमेदवार अंतिम करू शकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी विरोधकांच्या महाआघाडीवर केली.

गुंड-पुंड-झुंड यांना मातीत गाडा

जिल्हा परिषदेत जायची ज्यांची लायकी नाही, असे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी समीर भुजबळ यांचे नाव न घेता लगावला. पंतप्रधान मोेदी ‘आँधी नही तुफान है, मोदी हिंदुस्तानकी जान है, अशा शब्दांत त्यांनी मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास अयोध्येतच नव्हे तर लाहोरमध्येही राममंदिर बांधू. कारण तेव्हा जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नेस्तानाबूत झाला असेल, असे राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचे हात पुन्हा एकदा आपल्याला बळकट करायचे असल्याचे सांगत नाशिकमधील गुंड-पुंड-झुंडांना मातीत गाडा, असा घणाघात त्यांनी आ. छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचा नामोल्लेख टाळत केला. 

जगात भारतीयांचा मान वाढला : सतपालसिंह महाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारतीयांचा मान वाढल्याचे प्रतिपादन उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपालसिंह महाराज यांनी केले. ते म्हणाले हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचे आज स्मरण होते. पूर्वी विदेशात गेल्यानंतर आपण काही घेण्यासाठी, मागण्यासाठी आलो आहोत, अशी तेथील लोकांची भावना असायची. परंतु आज भारतीयांकडे गुंतवणूकदार, पर्यटक म्हणून आदराने पाहिले जाते. पुलवामा घटनेने देशवासी व्यथित झाले. या घटनेनंतर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे स्वातंत्र्य सैन्यदलाला देण्यात आले. 

मोदी यांच्या कुटनीतीमुळे अन्य देशही दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सक्षम हवाईदल, नौदल आणि भूदल हे भारताचे सामर्थ्य आहेच. परंतु त्याचबरोबर आता अंतरिक्षातही भारताचे सामर्थ्य निर्माण झाले आहे. ही ताकद पूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या देशांकडे होती. परंतु, आता हीच ताकद भारतानेही प्राप्त केली आहे. सॅटेलाइट्सच्या मदतीमुळे परकीय सत्तांची गुप्तहेरी रोखणे आणि भारतावर वाईट नजर टाकणार्‍यांना धडा शिकविणे यामुळे शक्य होऊ शकणार असल्याचे सतपाल सिंह म्हणाले.