Wed, Jun 03, 2020 07:53होमपेज › Nashik › शेतकरी हितासाठीच सरकारवर टीका : उद्धव ठाकरे 

शेतकरी हितासाठीच सरकारवर टीका : उद्धव ठाकरे 

Published On: Nov 04 2018 1:17AM | Last Updated: Nov 04 2018 1:24AMपिंपळगाव बसवंत : वार्ताहर

सातत्याने सरकारवर टीका करणारी शिवसेना आज भाजपासोबत कशी, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. मात्र, गेल्या चार वर्षांत सरकारच्या चांगल्या कामांत आम्ही कधीही खोडा घातलेला नाही, तर शेतकरी हितासाठी आणि चुकीच्या कामांमुळे सरकारवर टीका केली आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नांतून निफाड तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, निवासी शाळा, जर्मन तंत्रज्ञानाचे रस्ते आदी तीनशे कोटी रुपयांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ पिंपळगाव बसवंत येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे बोलत होते. याप्रसंगी ठाकरे यांच्या हस्ते डिजिटल स्क्रीनद्वारे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सुरू असलेली दर्जेदार कामे व जर्मन तंत्रज्ञानाने साकारत असलेल्या रस्त्यांबाबत  चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

ठाकरे म्हणाले, निफाडचे आमदार अनिल कदम यांच्यावर तुम्ही विश्‍वास टाकला आणि आज 300 कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ करून तसेच सुविधायुक्‍त ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, आदिवासी वसतिगृह आदी भव्यदिव्य वास्तू उभारून व जर्मन तंत्रज्ञानावर आधारित महाराष्ट्रातील पहिला रस्ता निर्माण करीत आमदार कदम यांनी तालुक्याचा विश्‍वास सार्थ ठरविल्याचा मला अभिमान आहे.
आपण सरकारवर टीका करीत नाही तर शेतकर्‍यांच्या हितासाठी बोलत असतो. कर्जमाफी दिल्याबाबत सरकार दावा करते. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. याबाबत सरकारनेच    आढावा घ्यावा, असे सांगत सरकारने पारदर्शक कर्जमाफी शेतकर्‍यांना देण्याची अपेक्षा व्यक्‍त केली.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणाचा धागा पकडत ठाकरे म्हणाले की, नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात येणार का आणि पाणीप्रश्‍नावर शेतकर्‍यांचे जोडे खाण्यापेक्षा माणसे जोडा. माझी बांधिलकी शेतकर्‍यांसाठी असून, त्यांची घरे पेटविण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या चुली कशा पेटतील, याकडे लक्ष द्यावे, असे खडे बोल सुनावत टोमॅटो व इतर शेतमालाच्या निर्यातीसाठी पाकिस्तान, बांग्लादेश यांच्या सीमा खुल्या व्हाव्यात, यासाठी मंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी एकत्र यावे व शेतमालाच्या भावाचा प्रश्‍न निकाली काढावा. आज भूमिपूजन झालेली कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्वांनीच लक्ष द्यावे आणि अशा भूमिपूजनाप्रमाणेच येथील राम मंदिराचे भूमिपूजन झाले पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्‍त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सत्तेची सूत्रे हाती घेतली त्यावेळी राज्याचे बजेट केवळ सतराशे कोटी रुपये होते. आज तेच बजेट सहा हजार कोटींचे आहे. यापूर्वी रस्त्यासाठी कधी निधीच राखीव नव्हता. गेल्या काही वर्षांत वाहने वाढली. वाहतूक वाढली. आयात निर्यात वाढली. त्यामुळे रस्ते खचत गेले. मात्र, दर्जेदार रस्ते निर्माण करण्याऐवजी डागडुजी व खड्डे भरणे असे काम पूर्वी होत होते. राज्यात केवळ पाच हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते. आज 22 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले आहे. तर सहा हजार किलोमीटर दर्जेदार राज्य मार्ग तयार झाले असून, दहा हजार किलोमीटर राज्यमार्गाचे रस्ते तयार होत आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून एक लाख सहा हजार कोटींचा निधी मिळाला असल्याचे यावेळी ना. पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यात हायब्रीड आणि अ‍ॅन्युईटी अंतर्गत 32 हजार किलोमीटरचे दर्जेदार रस्ते तयार होत आहे. तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीस हजार किलोमीटरचे रस्ते तयार होत आहे. महाराष्ट्राचा चेहरा बदलविण्यासाठी सर्वच मतदारसंघांत रस्त्यांसह विकासकामे सुरू आहेत. निफाडचे आमदार अनिल कदम अत्यंत अभ्यासू व कार्यक्षम आमदार असल्याने निफाडमध्ये जास्त कामे सुरू असल्याचे स्पष्ट करीत दुष्काळ प्रश्‍नावर शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी असून, 151 तालुके दुष्काळी म्हणून घोषित केले असले तरी परिस्थिती बघून इतरही तालुक्यांना दुष्काळी तालुके जाहीर करण्यात येतील, असे सांगत शेतकर्‍यांना दिलासा दिला.

पालकमंत्री महाजन म्हणाले, भाजपा-सेनेमध्ये तणाव आहे. सेनेच्या मंत्री व आमदारांना दुय्यम वागणूक दिली जाते.हे चुकीचे असून, याबाबत विरोधकांकडून अफवा पसरविल्या जात आहेत. आमदार कदम यांच्या निफाड मतदारसंघात सर्वाधिक विकासकामे सुरू असल्याने यावरून हे स्पष्ट होते.

आमदार कदम प्रास्ताविकात म्हणाले, पिंपळगाव बसवंत परिसर हा मिनी दुबई समजला जातो. शेतमालाचे प्रचंड उत्पादन व जागतिक बाजारपेठेमुळे पिंपळगाव परिसराला कॅलिफोर्निया म्हणून संबोधले जाते. येथील बाजार समितीत दररोज शेतमालाच्या हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीकडे जाणारा रस्ता जर्मन तंत्रज्ञानाने तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 15 कोटी रुपये खर्च करून साकारण्यात येत आहे. याच रस्त्यावर ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटर आहे. तसेच आदिवासी वसतिगृह या परिसरातच साकारले गेले आहे त्यामुळेच या भागात दर्जेदार रस्त्याची गरज होती. बाजार समिती रस्त्यासह तालुक्यात 93 किमीचे हायब्रीड रस्ते तयार होत असून, यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच आज सर्व विकासकामे साकारत आहे. शेतकर्‍यांसाठी व तालुक्यातील प्रमुख प्रश्‍नांसाठी आपला लढा व संघर्ष सुरू असून, मध्यंतरी पालकमंत्री गिरीश महाजन व आपल्यात काही मंडळींनी गैरसमज निर्माण केले होते. मात्र, आज त्यांचे व आपले सर्व हेवेदावे पूर्ण मिटले असल्याचे कदम यांनी जाहीर केले. नाशिक जिल्ह्यात मोठी द्राक्षशेती उभी आहे. दुष्काळामुळे व पाणीटंचाईमुळे द्राक्षबागेची इमारत कोसळली तर मोठे नुकसान होईल. म्हणूनच नाशिक जिल्ह्याला पाणी मिळाले पाहिजे आणि त्यासाठी पाणी राखीव ठेवले पाहिजे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, आमदार योगेश घोलप, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, सुरेश पाटील, भाऊसाहेब चौधरी, भास्कर बनकर, दिलीप मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या सोहळ्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, विजय करंजकर, जयदत्त होळकर, धनराज महाले, सुहास कांदे, सुरेश डोखळे, प्रल्हाद गडाख, विजय मोरे, राजेश पाटील, बाळासाहेब क्षीरसागर, दीपक शिरसाट, चिंतामण सोनवणे, डी. के. जगताप, पंडितराव आहेर, शिवा सुरासे, सुनील पाटील, सुधीर कराड, संजय वाबळे, नीलेश पाटील, प्रदीप अहिरे, नितीन बनकर, किरण लभडे, सुजित मोरे, सत्यजित मोरे, चंद्रकांत खोडे, कौस्तुभ तळेकर, चंद्रकांत बनकर, संजय वाघ, केशवराव बोरस्ते, किरण निरभवणे, आशिष बागूल, अमोल भालेराव आदींसह तालुक्यातून शिवसैनिक व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी प्रश्‍नावर उद्धव आक्रमक

कर्जमाफी व शेती प्रश्‍नावर लाल झेंडा हाती घेऊन शेतकर्‍यांचा मोर्चा मुंबईत आला होता. मी त्यांची बाजू घेत त्यांचे स्वागत केले म्हणून टीका होत असेल. मात्र, त्यांच्या झेंड्याचा रंग मी बघितला नाही तर, त्यांच्या अनवाणी पायातून निघणार्‍या लाल रक्‍ताचा रंग मी पाहिला होता. शेतकर्‍यांचे धान्य चालते, त्यांचा भाजीपाला चालतो मात्र त्यांच्या हाती लाल झेंडा आहे म्हणून त्यांची बाजू घ्यायची नाही, हे न पटणारे आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हातात आता देशाचे आरोग्य आहे. त्यामुळे त्यांच्या गोळ्याही आता बदलल्या आहेत. त्यांनी यापुढे आता पाकिस्तानला गोळ्या घालाव्यात, असे उद्धव यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

दुष्काळावर उपायोजना करा : उद्धव

सरकारच्या दोषांवर आतापर्यंत सातत्याने फटकारले आहे. चुकीच्या कामांना फटकारे मारणे ही ठाकरे घराण्याची घराणेशाही व परंपरा असून, महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. काही दिवसात हा दुष्काळ रौद्ररूप धारण करेल. त्यामुळे सरकारने सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

भीमा-कोरेगाव घटनेतील गुन्हे मागे घेणार

कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्याचा सरकारचा मानस असून, मराठा मोर्चा व भीमा कोरेगाव दंगलीतील दहा लाखांच्या आतील नुकसान झालेल्या घटनेतील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

सीमा खुल्या करण्याचे साकडे

निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटो व द्राक्षाचे उत्पादन होते. मात्र, सदर मालाच्या निर्यातीसाठी बांग्लादेश व पाकिस्तानच्या सीमा खुल्या कराव्यात आणि तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना गती द्यावी, असे साकडे यावेळी कदम यांनी डॉ. सुभाष भामरे यांना घातले. शिवसेना पक्षप्रमुखांसह सर्वांची उपस्थिती विकासकामांच्या उद्घाटनाला लाभल्याने आयुष्यातली खरी दिवाळी आपण साजरी करीत असल्याचे भावोद‍्गार आमदार कदम यांनी काढले.

गंगापूर, पालखेडमधून पाणी नाहीच 

संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट व पाणीटंचाई आहे. मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई असून, केवळ तेथे 20 टक्के पाणी शिल्लक आहे. मात्र, मराठवाड्याला पाणी सोडले तर नाशिकचे जोडे खावे लागतात आणि नाही सोडले तर मराठवाड्याचे जोडे खावे लागतात. म्हणूनच शासनाने पाण्याबाबत समान धोरण आखले आहे. असे असले तरी गंगापूर व पालखेड समूह धरणातून मराठवाड्याला पाणी सोडणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.

गुजरातला एक थेंबही पाणी देणार नाही 

राज्य सरकार लवकरच पिण्याच्या पाण्यासाठी व समृद्ध शेतीसाठी नद्याजोड प्रकल्प हाती घेणार असून, यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होणार आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय देण्यात येणार असून, वर्षभरात पाण्याच्या सर्व योजना मार्गी लावल्या जातील तसेच महाराष्ट्रातून एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी महाजन यांनी दिली.