Tue, Jun 02, 2020 22:13होमपेज › Nashik › दोन ट्रॅक्टर प्लास्टिक जळगावमध्ये जप्त

दोन ट्रॅक्टर प्लास्टिक जळगावमध्ये जप्त

Published On: Sep 10 2019 1:19AM | Last Updated: Sep 10 2019 12:53AM
जळगाव : प्रतिनिधी

राज्यात प्लास्टिकबंदी असतानाही सर्रासपणे वापर सुरू आहे. काही व्यापार्‍यांकडे प्लास्टिक साठा असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि मनपाच्या संयुक्त पथकाने एमआयडीसीतील गोदामांची तपासणी केली. यावेळी दोन ट्रॅक्टर प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच, व्यापारी विनय खानचंदाणी यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी दिली.

राज्य शासनाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी आणली आहे. मात्र, शहरात प्लास्टिक विक्री सर्रासपणे सुरू आहे. एमआयडीसीत विनय खानचंदाणी यांच्या गोदामामध्ये प्लास्टिक साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वावळे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, आरोग्य निरीक्षक शरद बडगुजर, संजय अत्तरदे, के. के. बडगुजर, धीरज गोडाले, प्रवीण पवार, विशाल वानखेडे यांच्यासह पथकाने गोदामामध्ये पाहणी केली. त्या ठिकाणी प्लास्टिकचा साठा आढळून आला.

मनपाच्या पथकाने गोदामामधील दोन ट्रॅक्टर प्लास्टिक साठा जप्त केला. तसेच प्लास्टिक व्यावसायिक खानचंदाणी यांना पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. या कारवाईमुळे प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान शहरात प्लास्टिक विक्रत्यांवर कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचे अधिकार्‍यांची सांगितले आहे.