पंचवटी : वार्ताहर
पंचवटीत एका पोलीस कर्मचार्याने दोघा तरुण सावत्र मुलांवर गोळीबार करीत त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घरगुती कारणातून ती घडल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित मारेकरी स्वतःहून पंचवटी पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय अंबादास भोये (वय 50, रा. राजमंदिर सोसायटी, अश्वमेधनगर, कॅन्सर हॉस्पिटल जवळ, पेठ रोड) असे संशयिताचे नाव असून, तो पोलीस कर्मचारी आहे. उपनगर पोलीस ठाण्यात त्याची नेमणूक आहे. भोये यांची पत्नी मनीषा तसेच सावत्र मुले सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (25) व शुभम नंदकिशोर चिखलकर (22) यांच्यासह एक मुलगी शुक्रवारी दुपारी घरात होते. ही दोन्ही मुले मनीषा यांच्या पहिल्या पतीपासून झालेली असून, संशयित संजय भोये यांच्यापासून एक मुलगा व मुलगी आहे. संजयची सावत्र मुले मनीषा यांच्या नावावर असलेला सध्याचा राहता फ्लॅट आपल्या नावावर करून मागत होते. या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून यांच्यात वाद सुरू होते. शुक्रवारी देखील याच कारणावरून वाद झाले. यावेळी भांडण इतके विकोपाला गेले की, भोये यांनी सावत्र मुलांवर गोळीबार करत सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधील चार गोळ्या झाडल्या. मुले बाथरूममध्ये जाऊन लपली असताना हा गोळीबार झाला. या घटनेत अभिषेक जागीच ठार झाला, तर शुभम जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत असताना मरण पावला.
उपनगर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असणारा संशयित संजय भोये सध्या बीट मार्शल म्हणून काम करीत होता. गुरुवारी (दि.20) भोये रात्रपाळी करून शुक्रवारी (दि.21) पुन्हा रात्रपाळी करिता जाणार होता. बीट मार्शल असल्याने, त्याच्याजवळ कायम सर्व्हिस रिव्हॉल्व्हर असायचे. शुक्रवारी दुपारी घरगुती कारणावरून वाद झाल्याने याच रिव्हॉल्व्हरमधून त्याने चार गोळ्या झाडल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, संशयित संजय भोये याने स्वतःहून पंचवटी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. डी. पाटील यांच्यासह न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पाहणी केली व माहिती घेतली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.