होमपेज › Nashik › वरिष्ठांसह इतरांवरही कारवाईची टांगती तलवार 

वरिष्ठांसह इतरांवरही कारवाईची टांगती तलवार 

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:13AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

कॅनडा देशाचे नागरिकत्व असलेल्या व्यक्‍तीवर एकतर्फी कारवाई करीत दोन गंभीर गुन्हे दाखल करण्याचा आणि तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका असल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गंभीर दखल घेतली असून, वरिष्ठांसह इतरांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. 

डॉ. सिंगल यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यातील एस. सी. सोनोने आणि अजीनाथ मोरे या दोघा पोलीस उपनिरीक्षकांना शुक्रवारी (दि.15) निलंबित केले आहे. या दोघांवरही गंभीर आरोप करण्यात आल्याने तसेच, आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात आले.  नितीन वसंत पाटील (रा. गंगापूर रोड) यांच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असून, मालमत्तेच्या वादातून त्रिमूर्ती चौकातील पाटीलनगर येथे राहणार्‍या त्यांच्या बहिणीने  नितीन यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले आहे.

त्यात 6 ऑक्टोबरला पाटील यांनी शरणपूर लिंकरोड येथील निवास रेसीडेन्सीमधील फ्लॅटचे कुलूप तोडून फ्लॅटचा बळजबरीने ताबा घेतल्याचा आरोप त्यांच्या बहिणीने केला. त्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नितीन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सोनोने करीत होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा नितीन यांच्या विरोधात त्यांच्या बहिणीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा तपास मोरे करीत होते. या प्रकरणी नितीन पाटील हे महिनाभर न्यायालयीन कोठडीत राहिले.  यामुळे नितीन पाटील यांनी थेट पंतप्रधानांसह दूतावास, पोलीस आयुक्‍त डॉ. सिंगल यांना पत्र लिहून आपबितीची तक्रार केली.

याची गंभीर दखल घेत डॉ. सिंगल यांनी चौकशी केली. त्यात नितीन पाटील यांनी त्यांची बहीण फ्लॅटचा ताबा घेत असल्याची तक्रार सरकारवाडा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली होती. मात्र, वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही. तसेच बहीण व इतरांनी इमारतीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नितीन पाटील यांनी केली होती. मात्र, सरकारवाडा पोलिसांनी याकडेही दुर्लक्ष केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, निलंबित पोलीस उपनिरीक्षक सोनोने आणि मोरे यांनी शरणपूर रोडवरील फ्लॅटजवळील आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचेही समोर येत आहे. यामुळे नितीन पाटील यांच्या आरोपांना बळकटी मिळत आहे. तसेच, या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांसह इतरांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, तसेच त्यांना या प्रकरणाची माहिती होती का याची चौकशी केली जात असून, त्यात संबंधित दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे समजते.