Fri, Jun 05, 2020 17:41
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › जिल्ह्यात दोघे जण बुडाले

जिल्ह्यात दोघे जण बुडाले

Published On: Sep 24 2019 1:41AM | Last Updated: Sep 24 2019 1:41AM
चांदवड/ मालेगाव :

नाशिक जिल्ह्यातील चांदवड व मालेगाव तालुक्यात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.23) उघडकीस आली. याबाबत माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील पुणेगाव-दरसवाडी कालव्याला 40 ते 45 वर्षांनंतर पाणी आल्याने सगळीकडे आनंद साजरा केला जात होता. यातच कालव्याला पाणी आले म्हणून दहिवद गावातील काही चिमुरडी रविवारी (दि.22) दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेली असता त्यात एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकर्‍यांच्या आनंदावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बहुप्रतिक्षित पुणेगाव-दरसवाडी कालव्यास मागील आठवड्यात पाणी सोडण्यात आले. कालव्याला गेल्या 40 ते 45 वर्षांनंतर प्रथमच पाणी आल्याने नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

मात्र, दुसरीकडे दहिवद येथील रोहित प्रशांत कांबळे (17) व इतर मित्र रविवारी (दि.22) दुपारच्या वेळी गावच्या शिवारातील पीर साईबाबा मंदिराजवळून वाहत असलेल्या पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहत असताना रोहित कालव्यात बुडत असल्याचे त्याच्या सोबतच्या मित्रांना कळताच ते घाबरून पळून गेले. सायंकाळच्या वेळी वडिलांच्या (प्रशांत) रोहित कुठे दिसत नसल्याचे लक्षात आले असता घरच्यांनी त्याचा शोध घेतला. यावेळी पुणेगाव-दरसवाडी कालव्यावर रोहितचे कपडे, चपला आढळून आल्याने त्याचा कालव्यात शोध घेण्यात आला. मात्र, अंधार पडल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. सोमवारी (दि.23) सकाळी 8 वाजता गणेश निंबाळकर, भूषण निंबाळकर, उत्तम खांदे, वैभव निंबाळकर व श्याम गांगुर्डे यांना रोहितचा शोध लागला. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यासंदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहितच्या पश्चात आई, वडील, दोन, बहिणी, आजी असा परिवार आहे. दुसर्‍या घटनेत मालेव तालुक्यातील चिंचावड येथील 42 वर्षीय इसमाचा मृतदेह सातभाई धरणात मिळून आला. आघार बुद्रुक येथील रहिवासी व सध्या चिंचावड येथे राहणारा भाऊसाहेब बंडू माळी असे मयताचे नाव आहे. मालेगाव मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. मालेगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तो पाठविण्यात आला. तो पाण्यात कसा पडला की त्याने आत्महत्या केली, याविषयी माहिती मात्र मिळू शकली नाही.